
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे जाहिरात बोर्ड उभारून विद्रूपीकरण थांबवा.स्टेडियमला असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहा : निलेश आखाडे यांनी केली मागणी.
भाजपाचे निलेश आखाडे आणि त्यांचे सहकारी यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन विनंती केली आहे की, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मारूती मंदिर येथे जाहिरातीसाठी बोर्ड लावण्यात येत असून यामुळे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची शोभा कमी होणार आहे. तसेच क्रिडांगणाची उभारणी करताना खेळते आणि मोकळे वातावरण कसे राहील याचा अभ्यास करून स्टेडियम बांधण्यात आले आहे. या जाहिरात बोर्डामुळे स्टेडियम मुख्य रस्त्यालगत पूर्णपणे झाकले जाणार आहे. तसेच स्टेडियमवर जाहिरात बोर्ड ज्या ठिकाणी लावण्यात आले आहे तेथे पूर्वीपासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम असे नाव पेंट करण्यात आले होते मात्र मागील काही वर्षात स्टेडियमला रंग काम करताना हे नाव झाकण्यात आले आहे. जाहिरात बोर्डामुळे ही सर्व बाजू झाकली जाणार आहे तरी प्रशासनाने या बाबत निर्णय घेऊन या क्रिडांगणाचे नाव दिमाखदार ठळक शब्दात पुन्हा एकदा लिहावे व स्टेडियमचे विद्रुपीकरण थांबवून स्टेडियमला मोकळा श्वास घेता येईल यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच रत्नागिरी शहरातील सर्व जाहिरात बोर्डांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, व अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करा अन्यथा यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल. अशी मागणी भाजपाचे आयटी सेल जिल्हा संयोजक निलेश आखाडे यांनी १४ मे रोजी मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे. यावेळी निलेश आखाडे यांच्यासह दादा ढेकणे, योगेश हळदवणेकर, ऋषिकेश केळकर, श्री साळवी, आदी उपस्थित होते.