
आपद्ग्रस्तांची कागदपत्रांसाठी ससेहोलपट, तात्काळ पंचनाम्यांच्या प्रती द्या-शौकत मुकादम यांची मागणी
चिपळूण:अतिवृष्टी,महापुरानंतर घरे,दुकानांमध्ये साफसफाईचे काम सुरू आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केले परंतु त्याचा एकही कागद आपद्ग्रस्तांना दिलेला नाही. विम्याच्या मदतीसह विविध कारणांसाठी सध्या पंचनाम्याची प्रत आवश्यक आहे.त्यासाठी येथील तहसिलदार कार्यालयात संबंधितांना अर्ज करण्याच्या सूचना केल्या जात आहेत.तसेच पाच ते दहा दिवसानंतर पुन्हा बोलावले जात आहे.नैसर्गिक प्रकोपात अगोदरच घरे -दारे, दुकाने उध्वस्त झाली आहेत. संसार उघडल्यावर आहेत.अशा परिस्थितीत घरातील चिखल, कचरा साफ करायचा की, पंचनाम्याच्या प्रतसाठी हेलपाटे मारायचे ?असा संतप्त सवाल माजी सभापती शौकत मुकादम यांनी केला आहे.या प्रकारातून पूरग्रस्त व नुकसानग्रस्तांची पुरती चेष्टा केली जात असून त्यांची ससेहोलपट सुरू आहे.त्यामुळे प्रशासनाने याबाबत गंभीर पाऊले उचलून आपद्ग्रस्तांना तात्काळ पंचनाम्याची प्रत द्यावी,अशी मागणीही त्यांनी केली आहे.वेगवेगळ्या कामांसाठी पंचनाम्याची प्रत पुरग्रस्तांना मिळणे गरजेचे आहे.मात्र यासाठी तहसिलदार कार्यालयाकडे १० रूपायांचे तिकीट लावून अर्ज करा,५ ते १० दिवसाने प्रत मिळेल , असे सांगितले जात आहे.चिपळूण तालुक्यामध्ये हजारों पूरग्रस्त आहेत,ते पंचनाम्याची प्रत मिळविण्यासाठी तहसिलदार कार्यालयात जाणार कधी ? तेवढा त्यांच्याकडे सध्या वेळ आहे का ? त्यामुळे त्यांनी या कार्यालयात हेलपाटे मारण्यापेक्षा ज्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केले आहेत त्यांनी पूरग्रस्तांना ती प्रत द्यावी अशीही मागणी मुकादम यांनी केली आहे
www.konkantoday.com