
दापोली तालुक्यात डम्परची धडक बसून एकाचा मृत्यू
दापोली तालुक्यातील आगरवायंगणी बौद्धवाडीजवळ काल (ता.६मार्च) रोजी रात्री १०.१५ चे दरम्यान डम्परची धडक बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी डम्पर चालकाविरोधात दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत दाभोळ सागरी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दिलीप गंगाराम निवणकर हे काल (ता.६) रोजी रात्री त्यांच्या ताब्यातील डम्पर क्रमांक एमएच.०८. एपी.२७८५ मधून पन्हाळेकाझी येथून वाळू भरून वणौशी येथे चालले होते. त्यांचे सोबत संदेश किसन येलवे हेही डम्परमध्ये होते. ते रात्री ११.१५ चे सुमारास आगरवायंगणी बौद्धवाडीजवळ आले असता समोरून डम्पर क्रमांक एमएच.०८. एपी.१५३८ भरधाव वेगाने येत होता, म्हणून निवणकर यांनी त्यांचा डम्पर रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबवला व ते खाली उतरले.
समोरून येणाऱ्या डम्परचा चालक हृषीकेश सुरेंद्र बारे याला माझ्या गाडीमध्ये लोड आहे तुझी गाडी रस्त्याच्या बाजूला थोडी खाली उतरव असे निवणकर यांनी बारे यांनी सांगितले. निवणकर हे बारे यांना बाजूने जाण्यासाठी साईड सांगत असताना बारे यांनी त्यांच्या ताब्यातील डम्पर वेगाने चालवून तो बाजूने नेत असताना त्याची धडक निवणकर यांना बसली व ते दोन्ही डम्परमध्ये चिरडले गेले व त्यात अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार संदेश येलवे यांनी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीनुसार संशयित हृषीकेश सुरेंद्र बारे याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.