बिबट्यांचा मानवी वस्तीतील संचार रोखण्यासाठी वन विभागाची सायरन लावून गस्त
रत्नागिरी ः जंगलात भक्ष्य मिळणे कठीण झाल्याने बिबट्या मानवी वस्तीकडे वळू लागला आहे. त्यातूनच माणसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे निर्माण झालेली ग्रामस्थांमधील भीती कमी करण्यासाठी वन विभाग सक्रीय झाला आहे. रात्रीच्यावेळी वन विभागाने पथकामार्फत पेट्रोलिंग सुरू केल्याची माहिती वन अधिकारी प्र्रियांका लगड यांनी दिली.
रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर, लांजा, चिपळूण, मंडणगड या तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढत आहे. जंगल भागाच्या जवळ असलेल्या वाड्या वस्त्याच्या जवळ भक्ष्य पकडण्यासाठी बिबट्या फिरताना दिसतो. रत्नागिरी तालुक्यात गणेशगुळे, मिरजोळे, निरूळसह अनेक ठिकाणी बिबट्याने गुरे, कुत्री पळविल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. अंधार पडल्यानंतर ग्रामस्थ घराबाहेर पडण्यासही घाबरत आहेत. वन विभागाकडून झालेल्या व्याघ्र गणनेमध्ये १५ बिबटे असल्याचे स्पष्ट झाले होते.