रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल शिवसेनेसोबतच

0
954

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून अखेर शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी आपल्या विजयाचा झेंडा रोवला आहे.त्यांच्या विरोधात असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या डॉ.निलेश राणे यांना पराभव पत्करावा लागला तर काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर यांना ५० हजार मतांवर समाधान मानावे लागले आहे.
ही निवडणूक चुरशीची ठरली होती.शिवसेना विरुद्ध स्वाभिमान असा हा सामना रंगला होता.मात्र या सामन्यात अखेर पुन्हा एकदा श्री.राऊत यांनी यश मिळविले आहे.त्यामुळे शिवसेनेची ताकद प्रकर्षाने सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदार संघात दिसून आली आहे.आज जाहिर झालेल्या मतदानाची आकडेवारी लक्षात घेता कणकवली व कुडाळ मतदार संघ वगळता सावंतवाडीसह चिपळूण,रत्नागिरी आदी मतदार संघात विनायक राऊत यांनी बर्‍यापैकी मते प्राप्त केली आहेत.तर राणेंचा बालेकिल्ला असलेल्या मालवण मतदार संघात राणेंना कमी मते मिळाली आहेत.
या सर्व धामधुमीत पुन्हा एकदा यश खेचून आणण्यासाठी श्री.राऊत यशस्वी ठरले आहेत.निवडणुकीपूर्वी राणेंकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.दोन्ही पक्षात जोरदार वाक्युद्ध रंगले होते.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक लढविली होती.तर विनायक राऊत यांनी झालेला विकास लोकांसमोर मांडून ते निवडणुकीला सामोरे गेले होते.या दोन्ही प्रक्रियेत लोकसभा मतदार संघातील जनतेने मात्र पुन्हा एकदा राऊत यांना स्विकारले असून त्यांना १ लाख ७३ हजार ६८१ मतांनी विजय मिळवून दिला आहे.