Tuesday, Jan 23rd

Headlines:

तालुकाच्या बातम्या

दातार वृध्दाश्रमाच्या नामफलकाचे अनावरण

E-mail Print PDF
दापोली (प्रतिनिधी)  दापोली शहरात कुमुदिनी दातार यांच्याहस्ते स्नेहसंध्या प्रतिष्ठान संचलित कै. गणेश दत्तात्रय दातार वृध्दाश्रमाच्या नामफलकाचे श्रीफळ वाढवून अनावरण करण्यात आले.
कुमुदिनी दातार यांनी आपले वडील कै. गणेश दत्तात्रय दातार यांच्या स्मरणार्थ स्नेहसंध्या प्रतिष्ठानला ३० गुंठे जमीन वृध्दाश्रमाकरीता दान केली. यावेळी वृध्दाश्रमाच्या अध्यक्षा शुभांगी गांधी, उपाध्यक्ष ऍड. विजयसिंह पवार, रविंद्र क्षिरसागर, नंदकिशोर भागवत, निलांबरी अधिकारी, सुहासिनी कोपरकर, समीर गांधी, राहुल साबळे, राकेश कोटीया, अशोक परांजपे, ऍड. विद्याभुषण वैद्य, राजेश रिसबुड, दीपक हर्डीकर, हरेश पटेल, विपुल पटोलिया, सतीश बर्वे आदी संचालक उपस्थित होते.

दुबळेवाडी येथे मल्लखांब प्रात्यक्षिकांचे आयोजन

E-mail Print PDF
दापोली (प्रतिनिधी)ः रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून दुबळेवाडी येथील श्रीराम मंडळाच्या वतीने मल्लखांब प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  दापोली तालुका मल्लखांब असोसिएशनने प्रथमच तालुक्यातील संलग्न मल्लखांब पथकांना एकत्रित करून यावेळी एक अनोखा बहारदार कार्यक्रङ्क  साजरा केला.
या मल्लखांब प्रात्यक्षिकांमध्ये वणंद गुजरवाडी येथील पद्मावती मल्लखांब पथक, आसूद येथील त्रिवेणी संगम मल्लखांब पथक  तसेच शिवाजीनगर (भौंजाळी) येथील मल्लखांब खेळाडूंनी सहभाग घेतला. यावेळी जमिनीवरील मल्लखांब आणि दोरी मल्लखांब या दोन प्रकारातील मल्लखांब प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.या कार्यामासाठी दापोली तालुका मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पवार, उपाध्यक्ष मंगेश राणे, सरचिटणीस सचिन गुजर, खजिनदार मकरंद गुजर, सदस्य दिलीप बांद्रे, विजय भुवड, दिपक चव्हाण, जयवंत रेवाळे, नंदकुमार बांद्रे आदी असोसिएशनचे पदाधिकारी तसेच श्रीराम मंडळाचे प्रमुख जयंत दुबळे, नरेश दुबळे, संजय जाधव, महेंद्र दुबळे, शैलेश खळे ,गिम्हवणे सरपंच उदय देवघरकर, चंद्रशेखर जोशी, संदेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यामाच्या यशस्वी आयोजनासाठी वणंद येथील पांडुरंग गुजर, सागर गुजर, कैलास गुजर तसेच आसूद येथील मनोज मांडवकर, बोथरे, रेवाळे यांनी परिश्रम घेतले.

श्री साई समर्थ मंदिराचा १२ वा वर्धापन दिन साजरा

E-mail Print PDF
दापोली (प्रतिनिधी) : दापोली येथील श्री साई समर्थ मंदिराचा १२ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्त सनई-चौघडा, पंचामृती पूजा, महिला व लहान मुलांकरीता मनोरंजनात्मक खेळ, आरती तर रात्री श्रृती आंबर्डेकर यांचे किर्तन रंगले. दुपारी साईबाबांचा प्रगटदिन सोहळा झाला. सायंकाळी साईनाथ रथयात्रा काढण्यात आली. रात्री महाआरती व तीर्थप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.
यानंतर   पोलिस उपनिरिक्षक शुभांगी म्हस्के, रामराजे महाविद्यालयाच्या संचालिका स्मिताली राजपुरे आणि कुणबी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका विद्या म्हसकर आदी महिलांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष सुधीर कालेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सचिव महेश महाडीक, साईनगर साईसेवा मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी मेहनत घेतली.

महालोक अदालतीमध्ये २८ प्रकरणे निकाली

E-mail Print PDF
दापोली (प्रतिनिधी) : दापोली-मंडणगड तालुका विधी सेवा समितीतर्फे नुकत्याच भरवण्यात आलेल्या महालोक अदालतीमध्ये २८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या महालोक अदालतीकरीता चार पॅनलच्या माध्यमातून प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
दिवाणी, फौजदारी व प्रिलीटीगेशन अशी एकुण २८ प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात आली. पहिल्या पॅनलमध्ये दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश तथा विधी सेवा समिती अध्यक्षा व्ही. एस. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल ऍड. अपर्णा कुलकर्णी, तालुका विधी सेवा समिती सदस्य रमा साठे यांनी काम पाहिले. तर २ ते ४ अशा एकुण तीन पॅनलमध्ये सहदिवाणी न्यायाधीश किरण खोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे पॅनल ऍड. शुभांगी सावके, सदस्य दिनेश पेडणेकर, ऍड. समिर कदम, सदस्या स्वाती भागवत, ऍड. आशिष बुटाला आणि सदस्य स्वाती भागवत यांनी काम पाहिले. महालोक अदालतीच्या यशस्वितेसाठी दिवाणी न्यायालय सहाय्यक अधिक्षक श्रीकांत मंडपे, वरीष्ठ लिपिक अनिल सावर्डेकर, कनिष्ठ लिपिक निळकंठ गोरे, कीर्तीकुमार आव्हाड आदींसह न्यायालयाच्या सर्व कर्मचार्‍यांनी मेहनत घेतली.

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम कुर्मगतीने; महामार्गावरील अपघातांचा धोका कायम

E-mail Print PDF
खेड (दिलीप जाधव) मुंबई गोवा महामार्गाचे कुर्मगतीने सुरु असलेले चौपदरीकरण, अपघात रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत संबधीत खात्याची उदासिनता यामुळे  मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कशेडी घाटात दरड कोसळु नये यासाठी दोन वर्षांपुर्वी शासनाने लाखो रुयपांचा निधी खर्च केला मात्र घाटात तुटलेल्या संरक्षक कठड्यांची डागडुजी करण्याबाबत काहीच निर्णय घेतला गेला नसल्याने घाटात होणार्‍या अपघातांचा धोका कायम आहे. खेड पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणार्‍या कशेडी आणि भोस्ते घाटात आतापर्यंत अनेक जिवघेणे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकजण कायमचे जायबंदी झाले आहेत.19-feb.-2014-nh-17-2मुंबई गोवा महामार्ग हा नागमोडी वळणांचा व घाट रस्त्यांचा मार्ग म्हणुन ओळखला जातो. वळणांवर ओव्हरटेक करताना समोरुन येणारे वाहन चालकाला दिसत नसल्याने दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन तसेच घाटात तुटलेल्या कठड्यावरुन खोल दरीत कोसळुन जिवघेणे अपघात होणे हे या मार्गावर नवीन नाही. गेल्या काही वर्षात या मार्गावर जिवघेणे अपघात होऊन अनेक निरापराध प्रवाशांचा बळी गेला आहे. कित्येकजण कायमचे जायबंदी झाले आहेत. एप्रिल व मे या दोन महिन्यात तर या मार्गावर होणार्‍या अपघातांची सं‘या कितीतरी वाढत असल्याने या दोन महिन्यात या मार्गावर यमराजाचा वावर असल्याची चर्चा प्रवाशांमधून ऐकावयास मिळते.
अपघाताना कारणीभुत ठरणारी अवघड वळणे काढण्यात यावी तसेच महामार्गावरील अवघड घाटांमध्ये अपघात होऊ नये यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून शासनाकडे सातत्याने केली जात आहे मात्र प्रवाशांच्या जिवीताची जरादेखील काळजी नसलेल्या चेतना हरवलेल्या शासनाकडुन याबाबत कोणतीही दखल घेतली जात नाही त्यामुळे दरवर्षी अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे.
महामार्ग क्रमांक १७ वर होणार्‍या अपघाताना आळा घालायचा असेल तर या मार्गाचे लवकरात लवकर चौपदरीकरण करणे अत्यावश्यक आहे. महाराठ्रात अन्य भागांमध्ये ज्या वेगाने महामार्गांचे चौपदरीकरण  झाले त्याच वेगाने  या महामार्गाचेही चौपदरीकरण व्हायला हवे. सध्या ज्या गतीने हे काम सुरु आहे त्याच गतीने हे काम सुरु राहिले तर चौपदरीकरणाचे काम पुर्ण होईपर्यंत आणखी कितीतरी जणांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.      
एप्रिल व मे या दोन महिन्यात मुंबई पुण्यातील चाकरमानी मोठ्या सं‘येने कोकणात येत असतात. यातील बहुतांशी चाकरमानी स्वत:ची किंवा भाड्याची वाहने घेऊन येत असल्याने या दोन महिन्यात मुंबई गोवा महामार्गावरील रहदारी कमालीची वाढलेली असते. भाड्याच्या वाहनांवरील चालकांना नागमोडी वळणांच्या व घाटरस्त्यांची सवय नसल्याने वळणांवर ओव्हरटेक करताना हमखास अपघात होतो आणि कुटुंबासह गावाला निघालेल्या चाकरमान्यांच्या रक्ताच्या सड्याचे महामार्ग भिजून जातो.
या दोन महिन्यांमध्ये आतापर्यंत अनेक अपघात या महामार्गावर झालेले आहेत. अपघातात अनेकांना आपला आधार गमवावा लागला आहे तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. काही कळ्या तर उमळण्या आधीच कोमेजल्या गेल्या आहेत. शुभकार्यासाठी किंवा देवदर्शनासाठी निघालेली कुटुंबच्या कुटुंब उद्ववस्त झाली आहेत. महामार्गावर जीवघेणा अपघात झाला, एखादे कुटुंब उद्धवस्त झाले की संबधित खात्याच्या मंत्र्यांना, अधिकार्‍यांना महामार्गाच्या चौपदरीकरणाची आठवण होते. कोणत्या तरी जाहीर कार्यक‘मात किंंवा प्रसारमाध्यमांद्वारे चौपदरीकरणाची घोषणा केली जाते. मात्र मे महिन्यानंतर सुरु होणार्‍या पावसात चौपदरीकरणाच्या घोषणा वाहून जातात आणि महामार्गावरील अपघातांचा धोका कायम राहतो.
महामार्गावरील कशेडी घाटात एका बाजुला उंच डोंगर तर दुसर्‍या बाजुला खोल दरी आहे. एखाद्या वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा जरासा देखिल सुटला तर खोल दरीत कपाळमोक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी दरी असलेल्या बाजुला मजबुत संरक्षक कठडे उभारणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत शासनाने लोखंडी कठडे उभारले आहेत मात्र ते तितकेसे मजबुत नसल्याने एकाद्या वाहन चालकाचा ताबा सुुटुन वाहन त्या कठड्यावर आपटले तर ते त्यावर न थांबता कठड्याला सोबत घेऊन दरीत कोसळत असल्याने लोखंडी कठड्याचा काहीही उपयोग होत नाही. भोस्ते घाटातील अवस्थाही तशीच आहे. मुंबईकडुन गोव्याकडे जाताना उजव्या बाजुला खोल दरी आहे. या दरीतही आजपर्यंत अनेक वाहने कोसळुन अपघात झालेले आहेत. या घाटामध्येही दरी असलेल्या बाजुला मजबुत सरंक्षक कठडा बांधणे आवश्यक आहे. शासनाकडे तशी मागणीही करण्यात आली आहे परंतु संबधीत खात्याकडुन तशी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने हा घाटही धोकादाय बनलेला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील नागमोडी वळणे, अवघड घाट, गेल्या काही वर्षात महामार्गावर वाढलेली रहदारी व त्यामुळे होणारे जिवघेणे अपघात या सर्वबाबी लक्षात घेऊन शासनाने एकतर महामार्गाचे युद्धपातळीवर चौपदरीकरण करावे किंवा घाटांमध्ये अपघात विरोधक यंत्रणा उभारावी अशी मागणी प्रवाशातुन केली जात आहे.

वयोमानामुळे जगबुडी पुल झाला धोकादायक; भीषण दुर्घटना घडण्याची शक्यता

E-mail Print PDF
खेड (दिलीप जाधव) - १५०हून अधिक वर्षे प्रतिदिनी हजारो वाहनांचा भार सोसणार्‍या महामार्गावरील जगबुडी पुलाची अवस्था दिवसेंदिवस दयनिय होत चालली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील अतिशय महत्वाच्या या पुुलाची डागडुजी किंवा पर्यायी  व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. मात्र दुर्देवाने या मागणीची शासनपातळीवर कोणतीच दखल घेत जात नाही. गतवर्षी  १९ मार्च २०१३ च्या पहाटे याच पुलाचा कमकुवत कठडा तोडून महाकाली ट्रॅव्हल्सची बस नदीपात्रात कोसळली होती. या भिषण अपघातात ३७ प्रवाशांचा बळी गेला होता.  या घटनेनंतर तरी शासनाचे डोळे उघडतील अशी अपेक्षा होती. मात्र वर्षे व्हायला आले तरी तशी कोणतीच हालचाल नसल्याने  भविष्यात या पुलावर १९ मार्चपेक्षाही भिषण  दुर्घटना घडली तर त्याबाबत आश्‍चर्य वाटायला नको.  
मुंबई- गोवा महामार्गावर असलेल्या भरणे येथील जगबुडी नदीवरील ११८.२० मीटर लांबीचा पुल ब्रिटीशांनी बांधला आहे. १०.६० मीटरचे सात व ११ मीटरचे पाच असे बारा गाळे असलेल्या या पुलाचे काम करताना भ्रष्टाचार हा शब्दच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे दिडशे वर्षे वाहनांचा कित्येक मेट्रिक टनभार पेलुन सुद्धा हा पुल दिमाखात उभा आहे. पावसाळ्यात जगबुडी नदीला येणार्‍या पुराच्या पाण्यात वाहुन येणार्‍या मोठमोठ्या लाखडी ओंडक्याचे या पुलाला आजवर अनेक हादरे बसले. परंतु माझा जन्म हा हादरे पचविण्यासाठीच झाला आहे असे जणु ठणकावुन सांगणार्‍या पुलाचा एक दगडदेखील पाण्याच्या प्रवाहाला काढता आलेला नाही.
२००५ साली कोकणामध्ये अतिवृष्टी झाली, खेड तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांच जगबुडीचे पाणी भरणे पुलावरुन वाहु लागले. जगबुडीच्या पाण्याचे जोरदार हादरे या पुलाला बसु लागले. सतत दोन दिवस पुराचे पाणी पुलावरुन वाहन होते. त्यामुळे गेली अनेक वर्षे पुराच्या पाण्याबरोबर सहजगत्या सामना करणारा ऐतिहासीक पुल यावेळी हार पत्करणार असेच वाटत होते. मात्र पुल रस्त्याचा पृष्ठभाग थोडासा उखडण्यापलीकडे पुराचे पाणी फारसे काही करु शकले नव्हते.
पुराच्या पाण्याचे हादरे पुलाचे फारसे काही करु शकले नाही हे जरी खरे असले पुलाचे वय व प्रतिदिनी या पुलावरुन धावणारी वाहने यांचा विचार केला तर या पुलाची डागडुजी करणे गरजेचे होते. कमकुवत झालेल्या पुलाच्या खांबाची दुरुस्ती करणे आवश्यक होते. उपलब्ध माहितीनुसार ’पुलाचे वय झाले असल्याने पुलाची डागडुजी करण्यात यावी’ असे पत्र थेट ब्रिटीश सरकारकडुन संबंधीत खात्याला आले आहे. पुलाला उद्भवणारा संभाव्य धोका ओळखुन ब्रिटीशांनी संबंधीत खात्याला खबरदार करण्यासाठी हा पत्रप्रपंच केलेला आहे. मात्र अद्याप या पुलाच्या डागडुजीबाबत संबधीत खात्याकडुन कोणतीही कार्यवाही सुरु नसल्याने ब्रिटीशांच्या त्या पत्रांची सबंधीतानी दखल घेतली असावी असे वाटत नाही.
राष्ट्रीय महामार्ग चिपळुण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या पुलावरुन प्रतिदिनी ६५ हजार मेट्रीक टन एवढी प्रचंड वाहतुक होत असते. वयोमानानुसार पुलाचे खांब हळुहळु निकामी होत असल्याने पुलावरील वाहतुकीस असलेला धोका दिवसेंदिवस वाढु लागला आहे. अवजड वाहने जेव्हा या पुलावरुन मार्गस्थ होत असतात त्यावेळी पुलाची होत असलेली थरथर पुलावरुन चालणार्‍या पादचार्‍यांना स्पष्टपणे जाणवू लागली आहे.  येत्या काळात या पुलाची डागडुजी किवा वाहतुकीसाठी पर्यायी पुलाची व्यवस्था केली नाही तर गेली अनेक तपे एकाद्या तपस्व्यासाखा उभा असलेला हा पुल जमीनदोस्त व्हायला वेळ लागणार नाही, असे मत जाणकार व्यक्त करत असल्याने महामार्गावरील हा पुल किती धोकादायक झाला आहे याची प्रचिती येते.
संबधीत खात्याच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार भरणे पुलासाठीचा प्रस्ताव संबधीत खात्याकडे पाठविण्यात आला आहे. भुपुष्ठ विकास मंत्रालयाकडुन अंतरिम मंजुरी मिळाल्यावर जगबुडी पुलासाठी पाच कोटीचा निधी मिळणार आहे. निधीच उपलब्धता होताच जगबुडी नदीवरील पुलाची पर्यायी व्यवस्था केली जाईल. संबधीत खात्याचे अधिकारी असे सांगत असले तरी तो निधी कधी उपलब्ध होणार आहे याबाबत काही सांगत नसल्याने  दुर्देवाने या पुलाला धोका निर्माण झाला आणि मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? या प्रश्‍नाचे उत्तर आजतरी कोणाकडेच नाही.

नाट्यगृह डागडुजीसाठी ७० लाखाचा निधी उपलब्ध, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नांना यश

E-mail Print PDF
खेड (दिलीप जाधव) ः गेली अनेक वर्षे दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेल्या खेड शहरातील स्व. मीनाताई नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी ७० लाखाचा निधी आणण्यात खेड नगरपालिकेला यश आले असल्याचे विश्‍वसनिय वृत आहे. नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी निधीची उपलब्धता झाल्याने आता लवकरच नाट्यगृहाचा पडदा उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खेड तालुक्याच्या सांस्कृतिक चळवळीला चालना मिळावी यासाठी  लाखो रुपये खर्चुन खेड  नगरपालीकेने सुसज्ज असे नाट्यगृह बांधले. नाट्यगृहाला कोणाचे नाव दयावे यावरुन त्यावेळी कॉंग्रेस व शिवसेनेमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. सभागृहाला भाऊसाहेब पाटणे यांचे नाव द्यावेे असा आठाह कॉंग्रेस पक्षाने धरला होता तर स्व.मिनाताई ठाकरे यांचे नाव देण्याचे शिवसेनेने निश्चीत केले होते. सध्याचे मनसेचे पदाधिकारी व त्यावेळी शिवसेनेतुन कॉंग्रेसमध्ये आलेले विश्वास मुधोळे यानी या नामकरण प्रकरणी सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात  उपोषणही केले होते.मात्र अखेर स्व.मिनाताई ठाकरे यांचे नाव नाट्यगृहाला देण्यात आले.
नाट्यगृह खेडवाशीयांच्या सेवेत रुजु झाल्यावर अनेक दर्जेदार नाटके खेडमध्ये येऊ लागली. खेडच्या नाट्यरसिकांना दर्जेदार नाटक पाहता येऊ लागली. त्याशिवाय खेडमध्ये होणार्‍या विविध राजकीय, शैक्षणिक,सांस्कृतीक कार्यक‘माना एक चांगले सभागृह उपलब्ध झाले. खेडच्या सांस्कृतीक चळवळीला एक वेगळी दिशा मिळाली. अनेक उदयोन्मुख कलाकाराना प्रेषकांसमोर आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपिठ मिळाले. खरंतर खेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभे राहिलेले हे नाट्यगृह खेेड तालुक्याच्या सांस्कृतीक चळवळीला एक वेगळी दिशा देणारे ठरले.  
सुरवातीची काही वर्षे खेड तालुक्याच्या सांस्कृतीक चळवळीचे हे व्यासपिठ खेड शहराच्या वैभवाचे प्रतिक ठरले. मात्र पुढे या नाट्यगृहांची योग्य ती  देखभाल न केली गेल्यामुळे सुरवातीच्या काळात नाट्यकलाकारानी नावाजलेल्या नाट्यगृहाची अवस्था अतिशय बिकट होत गेली. एकदा तर कोणता तरी कार्यक्रम सुरु असताना सभागृहातील पंखा निखळुन खाली कोसळला. सुदैवाने त्यावेळेला सभागृहात गर्दी नव्हती अन्यथा दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.  या घटनेनंतर नगरपालीकेने बोध घ्यायला हवा होता. आवश्यक ती डागडुजी करायला हवी होती मात्र नगरपालीकेने तशी कोणतीच खबरदारी न घेतल्याने महिन्याभरातच  एका शाळेच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सुरु असताना नाट्यगृहाच्या व्हरांड्यांचे प्लास्टर ऑफ पॅरिसचे सिलींग एकाएकी कोसळले. सुदैवाने त्यावेळी शालेय विद्यार्थी सभागृहात व्यासपिठावर सुरु असलेल्या कार्यक‘मात गर्क होते नाहीतर त्यावेळीही  मोठे अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
कार्यक्रम सुरु असताना सिलींग कोसळणे,   फिरता पंखा निखळुन पडणे, विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होणे, पावसाळ्यात छताला गळती लागणे या सर्व कारणांमुळे अखेर खेडची शान असलेले नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय नगरपालीका प्रशासनाला घ्यावा लागला. खेडच्या सांस्कृतीक चळवळीचे व्यासपिठ असलेले   नाट्यगृह लवकरात लवकर दुरुस्त करुन नाट्यरसिकांच्या सेवेत पुन्हा रुजु करण्याची हमी त्यावेळी नगरपालीका प्रशासनाकडुन देण्यात आली होती. मात्र १२ वर्षे उलटली तरी नाट्यगृहाचा बंद झालेला पडदा न उघडल्याने नाट्यगृहा पुन्हा नाट्यरसिकांसाठी खुले होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती.
खेड नगरपालिकेवर आघाडीची सत्ता असताना नाट्यगृहाच्या डागडुजीसाठी वैशिष्ट्यपुर्ण निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले गेले होते. डागडुजीच्या कामाला सुरवातही झाली होती मात्र कुठेतरी माशी शिंकली आणि पुन्हा डागडुजीच्या कामाला ब्रेक लागला.  त्यामुळे खेडच्या नाट्यरसिकांसाठी पुन्हा नाट्यगृहाचा पडदा उघडणार की नाही याबाबत साशकंता निर्माण झाली होती.
अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेले नाट्यगृह पुन्हा सुरु करण्याचे आश्‍वासन महाराष्ट्र नवनिर्माण निवडणुकीच्या वचननाम्यात मतदारांना दिले होते. त्या वचनाची पुर्तता करण्यासाठी मनसेने शासनाकडे निधीची मागणी केली होती. अखेर मनसेच्या या प्रयत्नांना यश आले असून शासनाने नाट्यगृहाच्या डागडुजीसाठी ७० लाखांचा निधी मंजुर केला आहे. आवश्यक तो निधी मंजुर झाल्याने गेली १२ वर्षे म्हणजे एक तप बंद असलेला नाट्यगृहाचा पडदा उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा

E-mail Print PDF
खेड (दिलीप जाधव) ः मुंबई - गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्यातून जाणार्‍या दहा किलोमीटरच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाला मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अखेर राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याने मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला वनविभागाचे लागलेले ठाहण अखेर सुटले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व वन मंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या पुढाकारामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला लागलेले वनखात्याचे ठाहण सुटले आता त्याच धर्तीवर राज्यात इतर ठिकाणी रस्ते बांधणीला वनखात्याने निर्माण केलेल्या अडचणी मुख्यमंत्री व वनमंत्र्यांनी सोडविणे गरजेचे आहे.
पनवेलपासून सुरु होणारा महामार्ग क्रमांक रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातून पुढे गोव्यात व तिथून केरळला जातो. पनवेल ते सिंधुदर्ग या दरम्यानचा महामार्ग अरुंद आणि नागमोडी वळणाचा आहे. पुर्वी या मार्गावर वाहनांची तितकीशी वर्दळ नव्हती मात्र अलिकडे या मार्गावर वाहनांची वर्दळ कमालीची वाढली आहे. वार्‍याच्या वेगाने धावणारी वाहने आणि शर्यतीत भाग घेतल्याप्रमाणे वाहने हाकणारे चालक यामुळे हा मार्ग अलिकडे अतिशय धोकादायक झाला आहे. या मार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
दरदोन दिवसाआड महामार्गावर पडणारा रक्ताचा सडा लक्षात घेऊन मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी जोर धरू लागली. आपल्या लेखणीच्या ताकदीवर सरकारला नमविणार्‍या पत्रकारांनीही आपली लेखणी बाजूला ठेवून महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आंदोलन छेडले. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट रोखून धरत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनी सरकारच्या डोळ्यात चांगलेच अंजन घातले. पत्रकारांच्या आंदोलनानंतर शासनाने मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेतला मात्र अर्नाळा अभयारण्यातून जाणार्‍या १० किलोमिटरच्या रस्त्याच्या मार्गात वनखात्याने काटे पसरल्याने महामार्गाच्या चौपदरीकरणाला ठाहण लागले.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचा ध्यास घेतलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी कर्नाळा अभयारण्यात मानवी साखळी आंदोलन करुन शासनाला मानवतेच्या धर्मासाठी महामार्गाचे चौपदरीकरण करणे किती आवश्यक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व वनमंत्री पतंगराव कदम यांना कर्नाळा अभयारण्यादरम्यान वनखात्याने पसरलेले काटे दुर करावे लागले. शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला लागलेले ठाहण आता पुर्णपणे सुटले आहे.
महामार्गावरील कर्नाला अभयारण्यादरम्यान जो निर्णय घेण्यात आला तोच निर्णय मुख्यमंत्र्यांनी राज्यातील इतर ठिकाणच्या रस्त्यांबाबतही घेणे आवश्यक आहे. रत्नागिरी- सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारे दोन रस्ते खेड तालुक्याच्या हद्दीतून पुढे जातात. रघुवीरघाट मार्गे सातारा, आणि हातलोट मार्गे सातारा असे हे दोन मार्ग आहेत परंतू या दोन्ही रस्ते एक-दोन किलोमिटरसाठी वनखात्याची जमीन आहे. वनखात्याने परवानी दिली असती तर हे दोन्ही मार्ग सातारा जिल्ह्याला कधीच जोडले गेले असते मात्र एक-दोन किलोमिटरच्या अंतरासाठी वनविभागाने परवानगी नाकारली असल्याने या दोन्ही रस्त्यांवर कोट्यावधीचा खर्च करुनही रत्नागिरी आणि सातारा हे दोन जिल्ह्ये एकमेकांना जोडले गेलेले नाहीत. वनविभागाच्या आडमुठेधोरणामुळे रत्‌‌नागिरीतून सातार्‍याला जाणार्‍या प्रवाशांना कित्येक किलोमिटरचा वळसा घालून जावे लागत आहे. कर्नाला अभयारण्य परिसरात वनखात्याने पसरलेले काटे मुख्यमंत्र्यांनी जसे दुर केले त्याच प्रमाणे रघुवीरघाट व हातलोट मार्गात वनखात्याने पसरलेले काटे दूर करणे आवश्यक आहे.

Page 2 of 2