Tuesday, Jan 23rd

Headlines:

इतर

मराठी चित्रपटांचा सकस आविष्कार

E-mail Print PDF
shwasसुमारे पंधरा वर्षापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवे परिवर्तन सुरू झाले. श्‍वास या चित्रपटाने या परिवर्तनाला सुरूवात केली. अंध मुलावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आणि त्याला दृष्टी मिळवून देण्यासाठी धडपडणार्‍या आजोबांची ही कहाणी अत्यंत भावस्पर्शी पद्धतीनं सादर करण्यात आलेल्या या कहाणीनं मराठी रसिकांना खिळवून ठेवलं. राष्ट्रपती पुरस्कार जिंकणारा तो दुसरा मराठी चित्रपट ठरला. पन्नास वर्षानंतर तो मान मराठी चित्रपटाला लाभला. त्यानंतर मात्र मराठीमध्ये अतिशय आशयसंपन्न चित्रपटांच्या निर्मितीची लाटच आली. त्यात वळू, टिंग्या, देऊळ हे काहीसे प्रायोगिक स्वरूपाचे आणि व्यावसायिक चित्रपटांमध्येदेखील निशाणी डावा अंगठा, कायद्याचं बोला, अगबाई अरेच्चा, शिक्षणाच्या आयचा घो, लालबाग परळ, अशा काही निवडक चित्रपटांनी वेगळी वाट चोखाळली. मराठी चित्रपट निर्मितीचा शुभारंभ करणारे आणि भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आणि चित्रनिर्मितीवर आधारित हरिश्‍चंद्राची फॅक्टरी हा चित्रपटसुद्धा अत्यंत वेगळा अन गाजलेला राष्ट्रपती पारितोषिक त्या चित्रपटालाही लाभलं. तसेच ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेतही त्याचा सहभाग होता. गेल्या पंधरा वर्षात उमेश कुलकर्णी, परेश मोकाशी, मंगे हाडवळे यांनी मराठी चित्रपटाला नवी दिशा आणि प्रेक्षकांना मराठीकडे खेचण्याची किमया केली. मराठी चित्रपट सृष्टीला नवसंजीवनी मिळाली आहे. सध्या वर्षातला ५० च वर मराठी चित्रपटांची निर्मिती होत आहे. नवा आशय घेवून अनेक मराठी चित्रपट पुढे येत आहेत.
मराठी चित्रपट कोर्ट ऑस्करच्या जागतिक स्पर्धेत सहभागी झाला. गेल्या पंधरा वर्षात झालेला हा बदल कथा आणि पटकथा लिहिणार्‍या कथाकारांमुळे झाला आहे. तसेच नव्या शैलीचा अंगीकार करणारे ताज्या दमाचे दिग्दर्शक पुढे आले आहेत. वितरण व्यवस्था समर्थ झाली. त्यामुळे मराठी चित्रपट एकाच वेळी सर्वदूर पोहचू लागला. सध्या वर्षाला ४० ते ५० इतक्या मोठ्या प्रमाणात मराठी चित्रपटांची निर्मिती होऊ लागली आहे. मराठी चित्रपट हिंदीशी स्पर्धा करु लागला असे सुखद चित्र दिसत आहे. मराठी चित्रपटदेखील कोटीच्या कोटी घरात जाऊ लागला आहे. देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये देखील मराठी चित्रपट मानमरातबासह झळकू लागला आहे. फिल्मफेअरसारखे प्रतिष्ठेचे मानले गेलेले पुरस्कार डी. वाय. पाटील फिल्फमेअर नावाने सुरू झाले आहेत. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित कोर्ट चित्रपटाने यंदा थेट ऑस्करच्या २०१६ साठीच्या शर्यतीत झेप घेतली. परदेशी भाषा विभागात कोर्ट भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. ऑस्करसाठी अधिकृत निवड झालेला कोर्ट हा हरिश्‍चंद्राची फॅक्टरी तिसरा मराठी चित्रपट आहे.katyar
जानेवारी महिन्याच्या प्रारंभीच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जीवनगाथा असलेला लोकमान्य एक युगपुरूष हा चित्रपट खरं तर इतिहासपट प्रदर्शित झाला. नीना राऊत निर्मित आणि ओमकुमार राऊत दिग्दर्शित हा चित्रपट होता. एका वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून काम करणार्‍या मकरंदला लोकमान्यांच्या आवाजाची कॅसेट सापडल्याची बातमी समजते. त्या निमित्ताने टिळकांचा अभ्यास करताना टिळक साकार करण्याचा प्रयत्न या सिनेमातून केला. सुबोध भावे या प्रतिभासंपन्न अभिनेत्याने लोकमान्यांच्या भूमिकेला अगदी उत्तम न्याय दिला. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाच्या पुरस्कारांचा मान मिळवविणारा, अविनाश अरूण यांनी दिग्दर्शित केलेल्या या किल्ला या चित्रपटाची देखील गौरवगाथा सांगायला हवी. या चित्रपटात आई आणि मुलाच्या अनुभवाची भावस्पर्शी गोष्ट दाखविलेली आहे. आईची कामातून बदली झाल्यानंतर एका गावात आलेल्या छोट्या चिन्मयची नव्या मित्रांशी जुळवून घेताना मानसिक हिंदोळ्याचा उभा छेद या चित्रपटातून अप्रतिम मांडलेला आहे. किल्लाने प्रेक्षकांच्या पसंतीचा आणि बॉक्स ऑफिसही गाजविलं. अलिकडच्या दशकभरात मराठी चित्रपट हा मोठ्या प्रमाणात संख्येने वाढतोय तसा तो गुणात्मक दृष्टीकोनातून देखील खूपच पुढे गेलेला दिसतो आहे. चाकोरीबद्ध विषयांच्या पलिकडे जाऊन नावीन्यपूर्ण, सकस, आशयघन आणि तांत्रिक दृष्टीकोनातून तपासता अतिशय सफाईदार अशा मराठी चित्रपटांची निर्मिती तितक्याच मोठ्या बजेटने होऊ लागलेली दिसतेय. मागच्या वर्षातला समीक्षकांनी नावाजलेला, प्रेक्षकांची प्रचंड साथ लाभलेला आणि म्हणूनच व्यवसायाच्या दृष्टीकोनातून करोडोंचे आकडे पार करणारा चित्रपट होता. मूळच्या पुरूषोत्तम दारव्हेकर लिखित, सुबोध भावेंनी दिग्दर्शन केलेला संगीत नाटकावर आधारलेला कट्यार काळजात घुसली हा सिनेमा. पंडित भानुशंकर शास्त्री आणि खॉं साहेब या दिग्गज शास्त्रीय गायकांमधली संघर्षमय संगीत गाथा या चित्रपटात दाखवलेली होती. संगीत स्पर्धेचा हा संघर्ष शेवटी एकमेकांच्या जीवनावर बेततो त्याची अत्यंत संस्मरणीय कथा या सिनेमात सुबोध भावेने तितक्याच ताकदीने मांडण्याचा अतिशय सुरेख प्रयत्न केला होता. यात शंकर महादेवन यांचा भानुशास्त्री जितका लाजवाब होता तितकाच तोलामोलाचा खॉं साहेब सचिन पिळगांवकर यांनी साकारून या भूमिकेचे अक्षरशः सोने केले.natsamarat
मराठी माणसाचा गगनभेदी आवाज म्हणजे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, त्यांच्याच व्यक्तीमत्वाला साकारण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अतुल काळे यांनी बाळकडू या चित्रपटात केला. मुंबईतील एका मराठी शाळेतील शिक्षकाला सतत बाळासाहेबांचा आवाज ऐकू येतो आणि त्यानंतर प्रेरणा मिळून पिचलेल्या, मराठी माणसाच्या मदतीसाठी हा नायक संघर्ष सुरू करतो. असा हा थोडा वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाने केला आणि महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये हा चित्रपट बरा चालला. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित कॉलेजच्या मित्रांच्या मैत्रीवर आधारित क्लासमेट हा चित्रपटदेखील आपटला. जानेवारी ते जून या पूर्वार्धात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच चित्रपट व्यावसायिक दृष्टीकोनातून सुपरहिट झालेले दिसतात.
-भालचंद्र दिवाडकर
(ज्येष्ठ पत्रकार)

गंगाराम गवाणकर-एक चमत्कार

E-mail Print PDF
gavankarविख्यात नाटककार गंगाराम गवाणकर यांची नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याची सुखद बातमी आली आणि त्यांचा सारा जीवनपट नजरेसमोर झटकन सरकला. मग चटकन मनात विचार आला की गंगाराम गवाणकर यांचं आयुष्य हा एक चमत्कार आहे. त्यांच्या जीवनात एक रंगतदार नाट्य आहे. त्यांना कोणतीही गोष्ट संघर्षाशिवाय मिळाली नाही. तेदेखील कधी हार मानून स्वस्थ बसले नाहीत. त्यांच्या हसतमुख चेहर्‍याकडे पाहिलं की, या माणसानं इतका लढा दिला असेल असे वाटत नाही. त्यांच्या वागण्या बोलण्यात मीपणा नसतो आणि कधी रडका सूर त्यांनी लावला नाही. उत्तम लोकसंग्रह त्यांनी केला. खूप मित्र जमवले. अत्यंत प्रेमाने सर्वांशी वागतात ते आपला मोठेपणा कधी आड येवू देत नाही. नाट्यसंमेनाचं अध्यक्षपद म्हणजे हमरीतुमरीवर येवून लढविलेली निवडणूक, त्यात राजकारणी डावपेच, उखाळ्यापाकाळ्या असं पडद्यामागचं नाटक असतं. पण अलिकडच्या काळात कसलाच गाजावाजा आणि वाद न होता सन्मानाने बिनविरोध अध्यक्षपदाचा मान दिला जात आहे असे गंगाराम गवाणकर हे आहेत. याचे कारण त्यांचा अजातशत्रू स्वभाव, त्यांचा लोकसंग्रह! एक दोनदाच त्यांच्याशी गाठभेट झाली. चिपळूणमध्ये नवटर्य प्रभाकर पणशीकर यांची एक जाहीर मुलाखत मी घेतली होती. त्या कार्यक्रमाला गवाणकर हजर होते. मागे कोठेतरी बसून मुलाखत मन लावून ऐकत होते. मुलाखत संपल्यावर स्वतः आले आणि पणशीकरांना अभिवादन करून माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, तू छानच घेतलीस मुलाखत! आता एकदा आपण करू असा मुलाखतीचा कार्यक्रम. मी भरुन पावलो असे दिलखुलास आहेत गवाणकर. कोकणी माणसाचा बेरकीपणा आहे तसाच चिवटपणा तर जबर आहे. म्हणून इतके चटके टोणपे खाऊन त्यांनी आपल्यातला लेखक जपला आणि त्याला सदैव ताजा तवाना ठेवला.
रत्नागिरीतले रंगकर्मी विनोद वायंगणकर यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते, गवाणकर यांचे महापुरूष पावलो हे नाटक वायंगणकर यांच्या ग्रुपने सादर केले. तेव्हा महिना दीड महिना गवाणकर नाटकांच्या तालमींसाठी रत्नागिरीत राहिले होते. त्यांच्यासाठी एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. गवाणकरांना स्वतः चमचमीत पदार्थ बनवून मित्राना खाऊ घालायची फार हौस. अधून मधून चिकन आणि मासे आणून स्वतः झणझणीत स्वयंपाक करून वायंगणकरांसह नाटकवाल्यांच्या ग्रुपला ते मसालेदार मेजवानी देत. रत्नागिरीत त्यांच्या मुलाखतीचा एक कार्यक्रमदेखील रंगला होता. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील रंगकर्मींशी त्यांची छान मैत्री आहे. स्थानिक कलावंतांना त्यांचे मार्गदर्शन लाभले याबद्दल विनोद वायंगणकर आणि त्यांचा सारा ग्रुप कृतज्ञ आहे. स्थानिक नाट्य चळवळीला चालना देण्यात त्यांचे योगदानही महत्वाचे आहे. गंगाराम गवाणकर राजापूर तालुक्यातील माडबनचे. पाचवीपर्यंत गावात शिक्षण झालं. शिकण्याची भारी आवड म्हणून आईनं उस्नं पास्नं करून त्यांना मुंबईला वडिलांकडे पाठवलं. मुंबईत आपला लेक आल्यावर वडिलांनी कपाळाला हात लावला. ह्य कित्याक इलस? असा सवाल त्यांनी केला. कारण वडलांनाच मुंबईत स्वतःचं छप्पर नव्हतं. ते एका हातात पाण्याची बादली आणि दुसर्‍या हातात किटली घेऊन चहा विकत. कुटुंबाला मनीऑर्डर पाठवत. आता लेकाच्या शिक्षणासाठी त्यांची कुतरओढ सुरू झाली. मुख्य प्रश्‍न रहायच्या जागेचा होता. अनेक दिवस मसणवटीतल्या एका इमारतीमध्ये राहून दिवस काढले. बापलेकांनी, गवाणकर आज हे सांगतात तेव्हा आपण सुन्न होतो. मॅट्रीकनंतर गवाणकर यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये ऍडमिशन घेतली. आणि कलाशिक्षण पूर्ण केलं. अतिशय अभावग्रस्त जीवन होतं. तरी त्यांची अभ्यास करण्याची आणि शिकण्याची आवड तसूभरही कमी झाली नाही. नाना प्रकारच्या खस्ता खाऊन त्यांनी अभ्यास केला. कबड्डी खेळण्यात ते वाकबगार होते. त्या खेळाच्या सामन्यात मिळालेल्या बक्षीसाच्या रक्कमेतून त्यांनी आवडती नवी कोरी पुस्तकं आणली. नव्या पुस्तकांचा वास घेत वाचता वाचता झोप केव्हा लागली ते कळलंच नाही. सकाळी  जागे झाले तर सारी पुस्तकं उंदरांनी कुरतडून पार दैना केली होती. कारण त्या कुबट खोलीत उंदरांचा सुळसुळाट होता. त्या पुस्तकांची ही दैना पाहून गवाणकरांना तेव्हा रडू आवरलं नाही. शिक्षणाचं वेड असलेले पण निराधारासारखे अभावग्रस्त आयुष्य जगणारे गवाणकर निर्धारानं शिकत राहिले. आपल्या मनात कलेचं प्रेम जोपासत आले. प्रसंगी चरितार्थासाठी ट्रकच्या मागे असलेल्या बुरी नजरवाले तेरा मुँह काला या सारख्या ग्राफिती रंगविण्याचे कामही त्यांनी केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते बेस्टमध्ये नोकरीला लागले. तेथेच त्यांचा प्रेमविवाह झाला. या नोकरीमुळे स्थिरता आली. आपण नाटककार होऊ असे त्यांना कधीच वाटले नव्हते. पण नियतीने त्यांच्या आयुष्याला हे अनपेक्षित पण रसिकांना भाग्यशाली ठरविलेले वळण दिले.
माडबनात लहानपणी देवीच्या उत्सवात चालणारी गाववाल्यांनी केलेली नाटके त्यांनी पाहिली होती. नाटक बसवताना होणारी धावपळ, गडबड गोंधळ यातली गंमत त्यांना खूप आवडायची आणि त्यात असलेलं नाट्य हेरल्यावर मनात त्यांचं बीज अंकुरलं. वस्त्रहरण नाटकाचा जन्म असा झाला. मालवणी भाषेत ते इरसाल नाटक त्यांनी लिहिलं. मच्छिंद्र कांबळी यांनी ते रंगभूमीवर आणलं. सुमारे तीस वर्षापूर्वी या नाटकाची सुरूवात यथातथाच झाली. पण एकदा पु. ल. देशपांडे यांनी पुण्यात त्यांचा प्रयोग पाहिला. पुण्यात प्रयोग म्हणून तो मराठी भाषेत केला. पु. ल. म्हणाले की, खरी मजा मालवणी भाषेतच आहे. मालवणी प्रयोग पाहू या. मग त्यांनी मालवणी प्रयोग पाहिला आणि हसून हसून मुरकुंडी वळली असं जाहीर अभिप्राय देणारं पत्र त्यांनी लिहिलं. ते पत्र प्रसिद्ध करण्याची परवानगी दिली. मग जादूच झाली. नाटक तुफान चाललं. मराठी माणसाला त्या मालवणी नाटकाचं जामच वेड लागलं. पाच हजारांहून जास्त प्रयोगाचा जागतिक विक्रम त्या नाटकाने केला आहे. गवाणकरांच्या कल्पनेतून साकारलेल्या या नाटकानं चमत्कार केला. मच्छिंद्र कांबळी यांची कारकिर्द घडविण्यात याच नाटकाचा फार मोठा वाटा आहे. गवाणकर यांनी आपली ही सारी वाटचाल माडबन ते लंडन व्हाया वस्त्रहरण या आत्मकथनपर पुस्तकात मांडली आहे. अत्यंत हृद्य असं हे आत्मचरित्र आहे.
१९६२ पासून ते नाट्य लेखन करीत आहेत. योगायोग म्हणजे त्यांच्या नाट्य लेखनाच्या सुवर्ण महोत्सवाच्या काळातच नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. १९६२ पासून त्यांची वीस नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आली आहेत. वस्त्रहरण या नाटकाचे पाच हजारांवर प्रयोग. वात्रट मेले या नाटकाचे दोन हजारांवर प्रयोग आणि वन रूम किचन या नाटकाचे एक हजारांवर प्रयोग अशी त्यांच्या नाटकाची वैभवशाली वाटचाल आहे. त्यांच्या अन्य नाटकांमध्ये वेडी माणसं, वर भेटू नका, दोघी, भोळा डँबिस, पोलीस तपास चालू आहे, वरपरीक्षा, वडाची साल पिंपळाक, चित्रांगदा, मेलो डोळा मारून गेलो आदि नाटकांचा समावेश आहे. त्यांनी एका वृत्तपत्रात व्हाया वस्त्रहरण हा तुफान लोकप्रिय झालेला कॉलम चालविला. ऐसपैस हा त्यांचा आणखी एक गाजलेला कॉलम आहे. त्यांच्या रंगभूमीवरील सेवेबद्दल नाट्यपदर्पण, नाट्य परिषद, पत्रकार संघ, कोकण कला अकादमी, प्रबोधन कलामंचतर्फे सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या वस्त्रहरण या नाटकाने मालवणी भाषा आणि संस्कृतीला जिव्हाळ्याचे स्थान आणि कमालीची लोकप्रियता मिळवून दिली. सार्‍या महाराष्ट्राला मालवणीची गोडी लागली.
मालवणी भाषेची सेवा आपल्या हातून झाली याचा त्यांना अतिशय अभिमान आहे. नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद लाभलं. त्याचं स्वागत करताना ते म्हणाले, ज्या मालवणी भाषेमुळे खळखळून हसवण्याचे आणि भरभरून खाण्याचे वेड उभ्या जगाला लावले त्या वाटेवरचा मी विनम्र साक्षीदार आहे. मालवणी भाषेला माझे कोटी कोटी प्रणाम आहेत. मायबाप प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळेच माझ्यातला लेखक आणि रंगकर्मी सदाबहार राहिला आहे. मालवणी मुलखात सोनचाफ्याच्या झाडासारख्या बहरलेल्या या लेखकानं आपल्या प्रतिभेच्या जोरदार अत्यंत समृद्ध नाट्यसृष्टी निर्माण केली आहे. त्यांचं अभिनंदन आणि उत्तम आयुरारोग्यासाठी आणि लेखनासाठी शुभेच्छा!
-भालचंद्र दिवाडकर
(ज्येष्ठ पत्रकार)

बालिका जन्माच्या स्वागतासाठी वृक्षारोपण

E-mail Print PDF
babyराजस्थानच्या ग्रामीण भागात बालिकेचा जन्म म्हणजे शापच मानला जात असे. बालिकांची उपेक्षा आणि हेळसांड तर नित्याचीच होती. कन्या भृण हत्या सर्रास चालायच्या, त्यातच बालविवाहाची प्रथादेखील शतकानुशतके चालत आलेली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आजही राजस्थानात ग्रामीण भागात बालविवाह हजारोंच्या संख्येने चालतात. देशभर हे भेसूर चित्र सर्वपरिचित आहे. अर्थात या कुप्रथांना पायबंद घालण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. राजेंद्रसिंह नामक जलपुरूषाने राजस्थानात वाळवंटी भागात पडणार्‍या नाममात्र पावसाचे पाणी अडवून हजारो एकर जमीन सुजलाम सुफलाम केली आणि जलक्रांती साध्य केली. तशीच आणखी एक क्रांती सुनिता शर्मा यांनी स्थापन केलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत झाली आहे. बालिका जन्म हा शाप नाही तर त्या बालिकांना सन्मानाने जगू द्या. त्यांच्या जन्माचे स्वागत करा अशी भूमिका ग्रामीण जनतेच्या मनावर ठसविण्याचे काम सुनिता शर्मा यांच्या स्वयंसेवी संस्थेने सुरू केले आहे. त्यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला. गावात हरितक्रांती घडवायची होती आणि मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याची जाणीवही रूजवायची होती. म्हणून त्यांनी अनोखी शक्कल लढविली. त्यांनी बालिकेच्या जन्माच्या स्वागतासाठी वृक्षारोपण करण्याचा उपक्रम सुरू केला. राजस्थानच्या दक्षिण भागात सिरोही नावाचा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यात सानवाडा नावाच्या गावापासून त्यांनी सुरूवात केली. त्या गावी बानोश्वरी नावाच्या देवीचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या आवारात एक कडुनिंबाचे रोपटे त्यांनी सुगना नावाच्या मुलीच्या जन्माच्या वर्षापूर्वी लावलेल्या त्या झाडाची देखभाल सुगना आणि त्यांची आई वागटू देवी या अत्यंत आत्मीयतेने करत आल्या आहेत. त्या दोघींचे एक गहिरे नाते त्या झाडाशी जुळले आहे. आता त्या गावात बालिका जन्माला आली की तिच्या स्वागतासाठी झाड लावायचे अशी पद्धतच पडून गेली आहे. ग्रामस्थांनी त्या उपक्रमाचे स्वागत करून अंमलबजावणी सुरू केली आहे. आजुबाजूच्या अनेक गावांमध्येही त्या प्रथेचे अनुकरण सुरू झाले आहे. आपल्या मुलीचं संरक्षण केलं पाहिजे ही जाणीव त्या गावातील जनतेच्या मनात रूजवायला खूप प्रयास करावे लागले. पण आता ही सवय सर्व ग्रामस्थांना लागली आहे. सिरोही जिल्ह्यात बालिकांचे प्रमाण दर हजारी ८३० इतके म्हणजे देशात सर्वात कमी आहे. २०११ च्या जनगणनेतून हे चित्र समोर आले. अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. म्हणून या जिल्ह्यात कन्या जन्माचे स्वागत करण्याची जाणीव निर्माण करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आता या जिल्ह्यात प्रत्येक मंदिराच्या भोवती शेकडो झाडे लावली गेली आहेत. बालिकांच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी ही झाडे लावली गेली आहेत. सुगना नावाची बालिका जन्माला आल्यावर लावलेला कडुनिंबाचा वृक्ष आता तिच्याच वयाचा म्हणजे पाच वर्षाचा झाला आहे. ती दररोज न चुकता झाडापाशी येते. त्याला कवेत घेते. झाडापाशी खेळते. अशा अनेक बालिकांचे आपल्या जन्माच्या निमित्ताने लावलेल्या वृक्षांशी गहिरे भावबंध जुळले आहेत. ही जशी जन्माच्या स्वागताची कहाणी झाली तशी प्रतापगड जिल्ह्यात एक वेगळीच प्रथा आहे. तेथे आपल्या आप्तांच्या निधनानंतर त्यांची स्मृती म्हणून झाडे लावली जातात. त्या वृक्षांविषयी आत्मीयता आणि श्रद्धा बाळगली जाते. ही झाडे उत्त जोपासली जातात. रेबडी नावाची जमात या भागात राहते. ती जमात वृक्षांना देव मानणारी आहे. झाडे आपल्याला सावली देतात. फळे देतात. लाकूड मिळते. म्हणून झाडांविषयी श्रद्धा बाळगणारी ही जमात आहे. प्राचीन काळापासून भारतीय समाजात झाडे आणि माणूस यांचे गहिरे नाते आहे. आपल्या धार्मिक परंपरेतही झाडांना महत्व आहे. वृक्षांची पूजा करण्याची प्रथा आहे. हे नाते शहरीकरणामुळे लुप्त होवू लागले. कुंडीतल्या झाडापुरते ते नाते उरले आहे पण आता त्याचे भयावह अनिष्ट परिणाम जाणवू लागल्यानंतर वृक्षारोपणाला महत्व आले आहे. शोभेसाठी आणि छायाचित्र वृत्रपत्रात झळकावे यासाठी वृक्षारोपण करणारे हौशी समाजसेवक गावागावात आहेत. पण कोणीही अपेक्षा न बाळगता रोज स्वतःच्या कष्टातून झाडांची मशागत करणारा आणि नवी झाडे लावण्याचे काम करणारा एक अवलिया आसाममध्ये आहे. त्याचा अलिकडेच पद्मश्री प्रदान करून  सरकारने गौरव केला आहे. त्याने सुमारे १२५० एकर एवढ्या जागेत एकट्याने जंगल निर्माण केले आहे. गेली अनेक वर्षे या भागात तो झाडे लावतो आहे. त्याची झाडांवर अपार निष्ठा आहे. एकट्यानं धडपड करून बिया टाकून, रोपं लावून जंगल फुलवणारा असा हा देश एकटाच आहे. बाराशे एकरातील समृद्ध जंगल हे त्याच्या कष्टाचं फलित आहे.
त्याचा आदर्श समोर ठेवून अगदी शहरी मंडळींनीही बिया जमवाव्या आणि उजाड माळरानावर, डोंगरावर त्या पावसाळ्याच्या सुरूवातीला लावाव्या. या धरतीवरती हिरवी माया कायम राहिली पाहिजे. तरच मानवजातीला जीवन सुसह्य होईल.
-भालचंद्र दिवाडकर
(ज्येष्ठ पत्रकार)

पाणीवाला बाबा

E-mail Print PDF
एकट्याने डोंगर फोडून दोन गावांना जोडणारा रस्ता तयार करणार्‍या बिहारमधल्या दशरथ माझीची सत्यकथा रूपेरी पडद्यावर आली आहे. मांझीने आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ पंचवीस वर्षे परिश्रमाची पराकाष्ठा करून हा रस्ता तयार केला. मांझीने हा रस्ता तयार करायच्या आधी दोन गावांना डोंगराला वळसा घालून ८० किलोमीटर अंतर पार करावे लागत होते. मांझीच्या रस्त्याने हेच अंतर अवघे ४ किलोमीटरचे झाले. आता राजस्थानमधल्या प्रेम सुखदास या साधूने आपल्या आईसाठी उंच डोंगराच्या दरीत एकट्याने पाणी साठवण्यासाठी बांधलेल्या धरणाच्या घटनेची माहिती प्रकाशात आली आहे.
जोधपूरपासून साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या नंदियाकला हे प्रेम सुखदास यांचे गाव. या गावातल्या वाड्या डोंगराच्या कुशीतच वसलेल्या आहेत. वर्षातले बाराही महिने गावातल्या महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी रोज पाच-दहा किलोमीटरची वणवण करावी लागते. सुखदास यांच्या आईलाही हाच त्रास सहन करावा लागे. उन्हाळ्याच्या दिवसात ४५ डिग्री सेल्सियसच्या तापमानातही त्यांच्या आईला पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागे. आपल्या आईला आणि परिसरातल्या रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी होणारा हा त्रास संपवण्यासाठी डोंगराच्या कपारीत रहायला गेले. ग्रामस्थांनी त्यांना वेड्यात काढले. पण कुणाचे काही न ऐकता त्यांनी धरण बांधून पूर्ण करण्याची जिद्द बांधली.
डोंगरातच त्यांनी आपल्याला राहण्यासाठी आधी गुहा खोदली. दहा फूट उंच आणि वीस फूट लांबी-रूंदीच्या या गुहेत त्यांनी जयसियारा आश्रम सुरू केला. या गुहेतच देव-देवतांची प्रतिष्ठापना केली. देवाची पूजाअर्चा झाल्यावर छिन्नी, हातोडा आणि कुदळ घेवून ते डोंगराच्या दरीत जात असत. दगड फोडत असत. ते दगड बाजूला टाकत असत. सलग तीन वर्षे त्यांनी डोंगराच्या दरीत पाणी साठवण्यासाठी मोठा तलाव खोदला. तो खोदताना निघालेल्या दगडांचा वापर करून २०१० मध्ये छोटे धरणही बांधले. पावसाच्या पाण्याने या धरणात पाणीही साठले. पण पुढच्याच वर्षी झालेल्या मुसळधार पावसाने हे धरण फुटले आणि धरणाची भिंत वाहून गेली. तलाव कोरडा ठक पडला.
धरण फुटले आणि वाहून गेले, तरी सुखदास या अपयशाने खचले नाहीत. त्यांनी नव्या जोमाने त्याच जागेवर पक्के सिमेंट कॉंक्रीटचे धरण बांधावयाचे ठरवले. त्यासाठी दहा किलोमीटर अंतरावरच्या गावातून त्यांनी एकट्यानेच सिमेंटची पोती खांद्यावरून धरणाच्या जागेवर वाहून आणली. धरणासाठी पुन्हा दगड जमवले आणि त्यांनी साठ फूट लांबीची, तीस फूट रूंदीची आणि तेरा फूट उंचीची भिंत तलावासाठी बांधून काढली. हे धरण मजबूत आणि भक्कम झाले. धरणात पाण्याचा भरपूर साठा झाला. नांदियाकला गावासह परिसरातल्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमचा सुटला. एकट्या साधूने बांधलेले हे भरभक्कम धरण बघण्यासाठी आजुबाजूच्या गावातलेही लोक यायला लागले.
सकाळी पूजापाठ आटोपल्यावर सुखदास यांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी गावोगाव तलाव बांधावेत, अशी मोहीमच सुरू केली. मी एकट्याने तलाव आणि धरण बांधले. ग्रामस्थांनी आठवड्यातला एक दिवस श्रमदान केल्यास प्रत्येक गावात वर्षभराच्या आत तलाव बांधून पूर्ण होईल, असे ते पटवून देतात. प्यायचे पाणी मिळवून देणे हे देवाचे आणि पुण्याचे कार्य आहे.
अशी श्रद्धा असलेल्या सुखदास याचा कृतिशील आदर्श घेवून जोधपूर परिसरातल्या डोंगराळ भागातल्या काही ग्रामस्थांनी सामूहिक श्रमदानो तलाव बांधले आहेत. राजस्थानातल्या या साधूचा वॉटरमॅन असा लौकीक आहे.
-भालचंद्र दिवाडकर
(ज्येष्ठ पत्रकार)

एक प्रेरणादायक क्षण

E-mail Print PDF
hospitalश्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टतर्फे उभारण्यात आलेल्या ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या समारंभात सहभागी झालेल्या प्रत्येकालाच धन्यतेचा आणि कृतकृत्य झाल्याचा अनुभव आला असेल. कोकणातील सर्व जिल्ह्यामधून, मुंबई पुण्यातून वैद्यकीय क्षेत्रातील शेकडो कार्यकर्ते तसेच हितचिंतक उपस्थित होते. या समारंभात मान्यवर वक्त्यांच्या भाषणातून सदर संस्थेच्या गेल्या चाळीस वर्षाच्या इतिहासाचा आलेख समोर आला. महाराष्ट्राला भूषण वाटावे असे आदर्श काम तेथे उभे झाले आहे. अध्यात्मामागचा मानव कल्याणाचा उद्देश येथे मूर्तीमंत साकार झाला आहे. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणजे जो आपुले, तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा असे संत तुकारामांचे वचन हेच आपल्या जीवनाचे अधिष्ठान आहे. अशा श्रद्धेने ते संप वचन आपल्या कृतीतून साकार करणारे अनेक ध्येयनिष्ठ वैद्यकीय तज्ञ आणि प्रशासन कुशल असे संचालक या संस्थेशी संपूर्णपणे एकरूप होवून काम करतात. त्यांच्या सार्‍या संकल्पाना स्वामी दिगंबरदास महाराज आणि त्यांच्या अध्यात्मिक परंपरेच्या गुरूभक्तीच्या दिव्य सामर्थ्याचे अधिष्ठान लाभले आहे. म्हणून तेथे केलेला प्रत्येक संकल्प साकार होतो आहे. स्वामी दिगंबरदास महाराज यांचे अनुयायी प.पू. काका महाराज यांच्या नेत्त्वाखाली, भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर यांचे चिरंजीव विकास वालावलकर, वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील, डॉ. नेताजी पाटील, डॉ. सुनिल नाडकर्णी, प्रशासकीय विभागाचे नेतृत्व करणारे श्री. गोडबोले आदीनी अविश्रांत परिश्रम करून हा प्रकल्प साकारला आहे. त्याच्या शुभारंभाच्या समारंभात सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केलेला आनंद, समाधान आणि कृतज्ञतेची भावना कधीच विसरता येणार नाही. या भव्य समारंभात प्रमुख पाहुणे आणि महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर यांचे भाषण हा या समारंभातील अत्यंत संस्मरणीय भाग होता. त्यांनी विनोद आणि चिंतन याचा सुंदर संगम आपल्या भाषणात साधला आणि वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्यापूर्वी चांगले विद्यार्थी, सुसंस्कृत आणि संस्कारांनी समृद्ध झालेला माणूस बना. तुमच्याविषयी रूग्णाच्या मनात गाढ विश्‍वास निर्माण व्हायला हवा असे तुमचे ज्ञान आणि आचरण असायला हवे आहे असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात पारंगत होण्याचा प्रयत्न करावा असे सांगताना प्रेम करणं, मारामार्‍या करणं, खेळ, नाटक, सिनेमा आणि डिबेटींग यापैकी काहीच करत नाही तर निदान अभ्यास तरी करा असं सांगितलं. तेव्हा हास्यस्फोट झाला. ते म्हणाले की तुमच्या चेहर्‍यावर कायम स्मितहास्य असायला हवे आहे. जग जिंकण्याचा तो मंत्र आहे. डॉ. राजदेकर सरांचं भाषण अत्यंत मिस्कील, खुसखुशीत आणि रंगतदार होतं. त्यांनी तीस वर्षाहून जास्त काळ वैद्यकीय क्षेत्रात अध्यापन केलं आहे. अस्सल शिक्षक आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्व बहुरंगी आहे. रसिक आणि मनस्वी गोष्टीवेल्हाळ, दिलखुलास आहेत हे त्यांच्या भाषणावरून जाणवलं.
  या समारंभात दुसरं अप्रतिम रंगलेलं भाषण होतं. दै. सागरचे संपादक नानासाहेब जोशी यांचं. त्यांनी ब्रिटनमध्ये पूर्वी वैद्यकीय सेवेला हिज मॅजेस्टीज सर्व्हिस असं सन्मानपूर्वक म्हणायचे तर नंतर त्याला डिव्हाईन सर्व्हिस म्हणजे प्रत्यक्ष देवाची सेवा अशा बहुमानदर्शक शब्दानी गौरवतात. परमेश्‍वरानं स्वतःच्या कामात मदतीसाठी डॉक्टरांना निर्माण केले आहेत असं त्यांनी सांगितलं तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यातच नानासाहेबानी एक गुगली टाकली. ते म्हणाले की डॉक्टरांची तीन रूपे असतात. पहिलं रूप असतं परमेश्‍वराचं. डॉक्टरांकडे येणार्‍या प्रत्येकाला तो परमेश्‍वरच वाटत असतो. त्या देवानं केलेल्या उपचारामुळे आपण बरे होणार असा त्यांचा विश्‍वास असतो. रोज डॉक्टर राऊंडला येतात आणि रूग्णाची चौकशी करतात तेव्हा त्याला डॉक्टर हा माणूस वाटतो आणि जेव्हा डॉक्टर बिल देतो तेव्हा तो दानव वाटतो असे ते म्हणाले. तेव्हा सारे सभागृह सात मजली हास्यात बुडून गेले. नानासाहेबांनी डेरवणच्या भूमीचा उल्लेख संतांची आणि देवाची भूमी असा केला. स्वामी समर्थांपासूनच असलेल्या गुरू परंपरेचा उल्लेख केला आणि त्या आशीर्वादाचे अमृतफळ म्हणूनच आज हा संकल्प साकार होतो आहे असे सांगितले. तेव्हा पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. स्वामी दिगंबरदास महाराजांनी या शाळादेखील नसलेल्या दुर्गम गावात सर्व प्रकारच्या शिक्षणाची, आरोग्य सेवेची सुविधा सिद्ध करण्याचा संकल्प चाणीस वर्षापूर्वी केला आणि भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर यांनी स्वामींच्या प्रेरणेने त्या कार्यात स्वतःला समर्पित केले. त्यातून रूग्णालय आणि आता सुसज्ज इस्पितळ तसेच जागतिक दर्जाचे स्टेडियम, अन्य शिक्षण संस्था उभ्या राहिल्या आहेत. याचा उल्लेख केला. या समारंभात जे चैतन्य होते, आत्मीयता होती आणि ध्येयनिष्ठा, सेवाबाव याचा जो उत्कट आविष्कार येथे दिसत होता तो सदैव प्रेयणादायी ठरेल. येथे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण किती समृद्ध असेल याची प्रचिती आली. सुमारे चाळीस वर्षाहून अधिक काळ वैद्यकीय सेवेत व्यतीत करून नानाविध सन्मान आणि यश संपादन करणारे अनेक तज्ञ या निमित्ताने उपस्थित होते. त्यात कर्करोग तज्ञ डॉ. श्रीपाद बाणावली, डॉ. सुधीर जोशी, डॉ. अच्युत जोशी, डॉ. सुनिल नाडकर्णी, डॉ. पंकज कुलकर्णी आदींचा समावेश होता. ते सर्व वैद्यकीय तज्ञ वालावलकर रूग्णालयात नियमित सेवा देतात. हे या संस्थेचे भाग आहे. वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी या रूग्णालयाला विदेशी तज्ञांचे सहकार्य लाभते आहे तसेच विदेशातून विद्यार्थी संशोधनासाठी येथे येतात, दरवर्षी विदेशी डॉक्टरांची एक टीम तेथे येते असे सांगितले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट करून सर्वांनी स्वागत केले. ग्रामीण भागात वैद्यकीय क्षेत्राचा ध्यास घेवून सुरू केलेल्या कामाचा हा कल्पनातीत विस्तार पाहून सर्वच विस्मय चकीत झाले.
-भालचंद्र दिवाडकर
(ज्येष्ठ पत्रकार)

Page 1 of 14

 • «
 •  Start 
 •  Prev 
 •  1 
 •  2 
 •  3 
 •  4 
 •  5 
 •  6 
 •  7 
 •  8 
 •  9 
 •  10 
 •  Next 
 •  End 
 • »