Wednesday, Feb 21st

Headlines:

कॅरमपट्टू रियाज अलीला शिवछत्रपती पुरस्कार

E-mail Print PDF
रत्नागिरी ः राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर कॅरममध्ये उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या रत्नागिरीच्या रियाज अकबर अली याला राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रिडा पुस्कार जाहीर झाला आहे. राज्याच्या क्रिडा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणार शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारा रियाज हा जिल्हयातील चौथा खेळाडू ठरला आहे. जिल्हयाच्या क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून रियाजवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून शनिवारी मुंबईतील विशेष सोहळयात पुरस्कारचे वितरण होणार आहे.
वयाच्या पंधराव्या वर्षापासून कॅरम खेळणा़र्‍या रियाज अलीने गेल्या २५ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवल़े जिल्हा व राज्यातील अनेक स्पर्धांमध्ये रियाजने लक्षणीय कामगिरी केली असून गेल्या ५ वर्षापासून तो ‘एअर इंडिया’ कडून खेळत आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत त्याने आपल्या नावावर अनेक विजयांची नोंद केली आहे. २०१६ मध्ये लंडन येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत दुहेरीत विजेतेपद तर एकेरातील उपविजेतेपद त्याने पटकावले होत़े तसेच २०१५ साली दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन आयसीएफ स्पर्धेत त्याने दुहेरी व एकेरी या दोन्ही मध्ये विजेतेपद पटकावले होत़े
राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळविणारा रियाज अली हा रत्नागिरी जिह्यातील चौथा खेळाडून ठरला असून यापुर्वी संदिप देवरूखकर (कॅरम), संपदा धोपटकर (पॉवरलिफ्टींग), प्रियदर्शनी जागुष्टे (पॉवरलिफ्टींग) यांना प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
शिवछत्रपती पुरस्कारासाठी झालेली निवड गेल्या हे गेल्या २५ वर्षातील माझ्या खेळाचे व मेहनतीचे फळ आह़े दोन वर्षापासून या पुरस्कारासाठी माझ्या नावाची चर्चा सुरू होती. रत्नागिरीकरांचे प्रेम व प्रोत्साहन याच्या बळावरच मी या स्थानापर्यंत पोहचू शकलो व त्यामुळेच पुरस्कारासाठी निवड झाली. भविष्यात जिह्यात कॅरमचा अधिक प्रसार होण्यासाठी लहान मुलांसाठी ऍकॅडमी उभारण्याचा विचार आहे.

विजयदुर्ग बंदर घेणार केंद्र सरकार ताब्यात

E-mail Print PDF
रत्नागिरी ः सिंधुदूर्गातील विजयदूर्ग बंदर ताब्यात घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून तेथील २ हजार एकरवर अत्याधुनिक बंदर विकसित करण्याची योजना आहे. हे बंदर नाणार परिसरात साकारणार्‍या महाकाय पेट्रोलियम रिफायनरी प्रकल्पाशी जोडले जाणार आहे. हे बंदर महाराष्ट्र सरकारकडून ताब्यात घेण्यासाठी केंद्र सरकारच्या नौकानयन मंत्रालयाने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी संयुक्तरित्या रत्नागिरी जिह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार येथे सुमारे २ लाख कोटी रुपये खर्च करुन ग्रीन रिफायनरी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपन्यांसोबत पुढील आठवडयात मुंबईतील ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र ग्लोबल समिट’ मध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे सामंजस्य करार होणार आहे. हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्याच दरम्यान विजयदूर्ग बंदराचाही विकास करण्याची योजना आहे.
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने २००८ मध्ये सुमारे २ हजार एकर जागेवर विजयदुर्ग बंदर ‘ग्रीन फिल्ड पोर्ट’ म्हणून विकसीत करण्यासाठी राजीव चंद्रशेखर यांच्या ज्युपिटर पॅपिटलशी करार केला होता. हे बंदर बांधा-वापरा-हस्तांतरीत करा (बीओटी) तत्वावर विकसीत करण्यात येणार आहे. यात हाऊसिंग डेव्हलपमेंट ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चरचीही मोठी गुंतवणूक आहे. बंदरासाठी संपादित २ हजार एकरपैकी बाराशे एकर जागा अन्य व्यक्ती व संस्थांना व्यावसायिकदृष्टया उपलब्ध करून देण्यात येईल. यातून मोठा महसूल निर्माण करणे अपेक्षित आहे.
विजयदुर्ग बंदर हे ‘लॅण्डलॉर्ड पोर्ट मॉडेल’ या विकास मानकांवर आधारित बंदर असेल अशी माहिती बंदर खात्याच्या अधिकाऱयांनी वृत्तसंस्थेला दिली. १०० दशलक्ष टन क्षमतेच्या या बंदरातून पेट्रोलियम, तेल आणि ल्युब्रिकंट यांची वाहतूक होणार आहे. यामध्ये सुमारे ६० टक्के आयात व बॉक्साईट, आंबा, नारळ व अनुषंगिक उत्पादनांच्या ४० टक्के निर्यातिचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी महाकाय कार्गो वाहतूक या बंदरातून होणार आहे. हे बंदर ग्रीन रिफायनरीच्या दृष्टीने अंत्यत महत्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रकल्प अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कोकण रेल्वेतील ऑनलाईन भरतीमुळे उमेदवार निवडीचे सत्य उघडकीस येईल

E-mail Print PDF
रत्नागिरी ः कोकण रेल्वेच्या स्थापनेवेळी प्रकल्पग्रस्तांना सर्वप्रथम रेल्वेच्या भरतीत सामावून घेण्याचे धोरण निश्‍चित करण्यात आले होते. परंतु कालांतराने त्यामध्ये बदल करून अन्य उमेदवारांना नोकरी देण्यात आली. अनेक प्रकल्पग्रस्त रेल्वेच्या नोकरीपासून वंचित राहिले आहेत. रेल्वेने नव्याने सुरू केलेल्या ऑनलाईन भरती प्रक्रियेमुळे पारदर्शकता येणार आहे. भरती प्रक्रियेमध्ये नेमका कोणाचा समावेश होतो. आलेल्या उमेदवारांपासून कोणाची निवड झाली याची अद्यावत माहिती मिळणार आहे. त्यामुळे किती स्थानिकांना रोजगार मिळणार हे स्पष्ट होणार असल्याने कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे सल्लागार उमेश गाळवणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबई नर्सिंग कायद्याचे डॉ. पावसकर हॉस्पिटलकडून उल्लंघन

E-mail Print PDF
रत्नागिरी ः पत्रकार प्रणव पोळेकर यांची पत्नी ज्ञानदा यांना प्रसुतीनंतर सहाव्या दिवशी जीव गमवावा लागला. पावसकर हॉस्पीटलच्या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवकर यांनी दखल घेत नर्सिंग होम परवाना निलंबित केला आहे. दरम्यान यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत हॉस्पिटलमध्ये अनेक त्रुटी व नियमभंग आढळून आल्याची माहिती डॉ. देवकर यांनी दिली.
ज्ञानदा प्रणव पोळेकर यांची सिझरद्वारे प्रसुती झाल्यानंतर डॉ. दिपा व डॉ. संजीव पावसकर कॉन्फरन्सच्या निमित्ताने बाहेर गेले होते. हॉस्पीटलमध्ये एकही डॉक्टर नसताना परिचारिकांनी रूग्णांना ऍडमिट करून घेणे हा मोठा गुन्हा आहे. ज्ञानदा यांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला, मात्र शनिवारी पुन्हा त्रास होवू लागल्याने पावसकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पीटलमध्ये डॉक्टर नसल्याची कल्पना न देताच नर्सिंग स्टाफने त्यांना दाखल करून घेतले. जेव्हा ज्ञानदा यांची प्रकृती अतिशय नाजूक झाली तेव्हा नातेवाईकांनीच पुढाकाराने दुसरीकडे हलविण्याचा निर्णय घेतला.
हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे ज्ञानदा यांचा नाहक बळी गेला. आमदार उदय सामंत आणि राजन साळवी यांनी ज्ञानदा यांची उपचाराची फाईल नर्सकडे मागितले असता फाईल डॉक्टरांच्या कपाटात असल्याचे सांगितले. मात्र ऍडमिट करताना डॉक्टर पुण्याला होते मग फाईल त्यांच्या कपाटात कशी? असा संतप्त सवाल आमदारांनी विचारला असता एक कागद परिचारीकेच्या घरात सापडला. एकंदरीत आपला निष्काळजीपणा बाहेर पडू नये यासाठी डॉ. पावसकर यांनी फोनाफोनी करून परिचारिकांना मॅनेज केले होते हेदेखील सिध्द झाले आहे.
सोमवारी रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवकर यांची भेट घेवून कारवाईसंदर्भात माहिती घेतली. यावेळी डॉ. देवकर यांनी हॉस्पीटलमध्ये अनेक अनधिकृत बाबी आढळल्याचे सांगितले. एका विवाहितेचा केवळ हलगर्जीपणामुळे नाहक बळी गेल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले असले तरी मॅटर्निटी डेथ रेव्हयू कमिटी मार्फत दोन दिवसात याबाबत सखोल चौकशी करण्यात येईल असे डॉ. देवकर यांनी सांगितले.

भोस्ते-जगबुडी पूल खचल्याच्या अफवेने घबराट

E-mail Print PDF
खेड ः मुंबई-गोवा महामार्गासाठी पर्यायी मार्ग असलेला भोस्ते-जगबुडी पूल खचल्याच्या अफवेने सोमवारी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. याबाबतची माहिती मिळताच विविध खात्यांचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पुलाच्या एका बाजूची तांब्याची पट्टी गायब होऊन काहीशी पोकळी निर्माण झाल्याचे लक्षात येताच यंत्रणांनी काहीसा निःश्वास टाकला. पुलाच्या एका टोकाला निर्माण झालेल्या पोकळीत तांब्याची पट्टी बसवण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान पुलाला कोणाताही धोका नसल्याचा निर्वाळा बांधकाम विभागाने दिला आहे.
महामार्गावर दुर्घटना घडल्यास भोस्ते-जगबुडी पुलाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर केला जातो. कोंडिवली, शिव, आष्टी, वेरळ, भोस्ते आदी गावांसह अन्य गावांतील ग्रामस्थ याच पुलावरून शहरात बाजाररहाटसाठी येत असतात. याशिवाय वाहनांचीही याच पुलावरून सतत रेलचेल सुरू असते. विशेषतः रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी या पुलाचा रिक्षा व्यावसायिक अधिक वापर करतात. सोमवारी नेहमीप्रमाणे या पुलावरून रिक्षा व्यावसायिकांची वर्दळ सुरू असतानाच पुलाच्या एका बाजूला पोकळी निर्माण झाल्याचे दृष्टीस पडले. ही बाब कर्णोपकर्णी होत पूल खचल्याची अफवा पसरली.
याबाबत माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, जि. प. बांधकाम खात्याचे अधिकारी, पोलीस यंत्रणांसह अन्य यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आमदार संजय कदम यांनीही घटनास्थळी भेट देत अधिका़र्‍यांना सूचना केल्या. खबरदारीचा उपाय म्हणून सुरूवातीला काही वेळ पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. पुलाच्या एका बाजूला निर्माण झालेल्या पोकळीची संबंधित अधिकार्‍यांनी सखोल पहाणी केली असता या भागातील तांब्याची पट्टी गायब असल्याचे दृष्टीस पडले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंना बॅरिगेटस् लावून एकेरी वाहतुकीचा अवलंब करण्यात आला. पोकळी निर्माण झालेल्या ठिकाणी तांब्याची पट्टी टाकण्याचे काम दुपारच्या सुमारास हाती घेण्यात आले. या मार्गावरून धावणार्‍या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पुलास कोणत्याहीप्रकारचा धोका नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बांधकाम खात्याने केले आहे.
हा पूल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित होता. मात्र त्यानंतर हा पूल जि. प. बांधकाम खात्याकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. या पुलाची उर्वरित प्रलंबित राहिलेली कामेही तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे येथील जि. प.चे बांधकाम उपअभियंता एम. बी. खेडेकर यांनी सांगितले.

१५०० रुपये डझन भावाने हापूस शहरात विक्रीला

E-mail Print PDF
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरातील गोखलेनाका येथे आंबा विक्रेत्या सौ. लता भंडारे यांच्या स्टॉलवर हापूस आंबा विक्रीसाठी आला आहे. आंब्याचे दर १२०० ते १५०० रुपये डझन आहे. आठवड्याला आंबा बागायतदारांकडून त्यांच्याकडे ३ ते ४ पेट्या विक्रीसाठी येत आहेत.
गोखले नाका येथील आंबा विक्रेत्या सौ. लता भंडारे यांच्या स्टॉलवर कसोप, गोळप येथून हापूस आंबे विक्रीसाठी येत आहेत. हापूसबरोबर रायवळ कैरी, पायरी, आंबे विक्रीला आले आहेत. रायवळ कैरी १००, १२० रु. किलो आहे. पायरी आंबा ८००, ९००, १२०० रुपये डझन आहे.

Page 8 of 2732