रत्नागिरीतील लोकमान्य टिळक ग्रंथालयाचे होणार आधुनिकीकरण; राज्य सरकारकडून 74 लाखांचा निधी मंजूर
रत्नागिरी : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती शताब्दी उपक्रमांतर्गत रत्नागिरीतील शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशनसाठी राज्य सरकारने 74 लाखाचा निधी मंजूर केला आहे. यातून शासकीय विभागीय ग्रंथालयात अनेक नावीन्यपूर्ण सुविधा वाचकांना उपलब्ध होणार आहेत. शासकीय विभागीय ग्रंथालयात 1977 पासूनचे वर्तमानपत्र आहेत. याशिवाय दुर्मिळ अशी हस्तलिखित, ग्रंथ असून, त्याचे जतन केले जाणार आहे. त्यासाठी एक मोठा स्कॅनर घेतला जाणार असून, त्याद्वारे जुने वर्तमानपत्र आणि दुर्मिळ ग्रंथाचे जतन केले जाणार आहे.
रत्नागिरीतील लोकमान्य टिळक शासकीय विभागीय ग्रंथालयाचे नूतनीकरणाचे कामही हाती घेण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून या ग्रंथालयाच्या नुतनीकरणासाठी जवळपास सव्वा चार कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे ग्रंथालय सध्या सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीत हलविण्यात आले आहे. ग्रंथालयात अनेक सुविधा वाचकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यात प्रामुख्याने ई-ग्रंथालय, ई-बुक, ई-जनरल, ऑडियो बुक आधीचा यात समावेश असेल. वाचन सेवा ठप्प होऊ नये, तसेच वाचकांना घरबसल्या वाचनाची सुविधा निर्माण व्हावी असा प्रयत्न आहे. याशिवाय ग्रंथालयात येणार्या वाचकांसाठी टॅब्स, किंडल्स आधी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर लहान मुलासाठी स्वतंत्र ई-लायब्ररी सुविधा निर्माण केली जात आहे. ग्रंथालयातील पुस्तकांची देवाण-घेवाण सहजसोपी व्हावी यासाठी ग्रंथालयात आर.एफ.आय.डी. यंत्रणा बसविण्यात येणार आहे. स्वयंसंचालित देवघेवीमुळे ग्रंथालयाचे कामही जलदगतीने होणार आहे.