
पाली शाळा क्र. १ च्या विद्यार्थ्यांची प्रगती वाखाणण्याजोगी : अॅड.सुयोग कांबळे
रत्नागिरी : “पाली शाळा क्र.१ च्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ही खरच वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उपयुक्त आवश्यक शालेय गरजांची पूर्तता करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, जेणेकरून हे विद्यार्थी शैक्षणिक, क्रीडा क्षेत्राच्या सोबतच सर्वांगीण दृष्टीने दर्जेदार गुणवंत होण्यास मदत होईल”, असे प्रतिपादन तालुक्यातील हातखंबा पाली जि. प. गटाचे नवनिर्वाचित सदस्य अॅड. सुयोग कांबळे यांनी केले.
त्यांनी नुकतीच आदर्श विद्यामंदिर पाली नं. १ शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे, विद्यार्थी सुरक्षा समितीचे सदस्य अॅड. सागर पाखरे, मुख्याध्यापक जनार्दन मोहिते, पदवीधर शिक्षक मारुती घोरपडे, श्रद्धा रसाळ, नेहा जाधव, श्रुती वारंग उपस्थित होते.
यावेळी ॲड. कांबळे यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्याबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या पाली शाळेच्या हर्ष महेश धाडवे (इ. सहावी) आणि यश महेश डोंगरे (इ. सातवी) या दोन विद्यार्थ्यांचा त्यांनी विशेष सत्कार करून गौरविले. हा अभ्यास दौऱ्यात केरळ अनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर, राजा रवीवर्मा आर्ट गॅलरी, पद्मनाभ स्वामी मंदिर त्रिवेंद्रम, कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक, गांधी मंडपम, त्रिवेणी संगम येथे विद्यार्थी भेट देणार आहेत.




