
गणपतीपुळेत ७० हजार भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन
गणपतीपुळे : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे मंगळवारी ६ जानेवारी रोजी नववर्षातील पहिला अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या उत्साही, भक्तिमय वातावरणात शांततेत पार पाडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ७० हजार भाविकांनी स्वयंभू श्रींचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली.
या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवासाठी आलेल्या भाविकांनी सोमवारी रात्री साडेबारा वाजल्यापासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. या अंगारकीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीकडून श्रींचे मंदिर पहाटे साडेतीन वाजता दर्शनासाठी खुले करण्यात आले. मुख्य पुजारी अमित घनवटकर यांच्या हस्ते पूजाअर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत श्रींचे मनोभावे व श्रद्धापूर्वक दर्शन घेतले.
यात्रोत्सवासाठी मोठी रांग लागत असल्याने गणपतीपुळे संस्थानकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांची वाहन पार्किंग व्यवस्था स्मशानभूमी येथील सागर दर्शन पार्किंगमध्ये नियोजनबद्ध करण्यात आली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १८ पोलिस अधिकारी आणि १४५ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
सायंकाळी साडेचार वाजता ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात गणपती मंदिराच्या प्रदक्षिणामार्गे श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री चंद्रोदयानंतर साडेदहा वाजता मंदिर बंद करण्यात आले.




