
ग्रामीण भागातील शाळा बंद करण्याचा निर्णय दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घातक ठरेल -शौकतभाई मुकादम
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळा बंद करण्याचा शासनाचा प्रस्ताव गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी घातक निर्णय ठरेल, अशी तीव्र प्रतिक्रिया पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती दयनीय असून अशा पालकांना मुलांना शहरात इंग्रजी माध्यमात किंवा खासगी शाळांत शिकवणे परवडणारे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शौकत मुकादम म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा या ग्रामीण समाजाचा शैक्षणिक कणा आहेत. पटसंख्या कमी-जास्त असू शकते; परंतु इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा प्रत्येक गावात असणे अत्यावश्यक आहे. गरीब कुटुंबातील मुलांचे शिक्षण ग्रामीण शाळांवरच अवलंबून आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेण्यासाठी भाड्याच्या घरात राहावे लागते, वाहतुकीचा खर्च, शैक्षणिक साहित्याचे खर्च वाढतात. हे सर्व खर्च गरीब पालकांना परवडणारे नाहीत. शासन ज्या पालकांसाठी लाडकी बहीण, संजय गांधी निराधार योजना अशा आर्थिक निकषांवर आधारित योजना राबवते, त्या कुटुंबातील मुले महागड्या शिक्षणाचा खर्च कसा पेलणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
www.konkantoday.com




