
डिजिटल ॲरेस्ट’ची मुंबईत दहा महिन्यांत १४२ प्रकरणे, ११४ कोटी रुपयांची फसवणूक; मु्बई सायबर पोलिसांची जनजागृती मोहिम!
मुंबई : देशभरात ‘आभासी अटके’च्या (डिजिटल अटक) नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक नोंदली जात आहे. जानेवारी ते ॲाक्टोबर अखेरपर्यंत मुंबईत १४२ गुन्हे नोंदले गेले असून त्याद्वारे ११४ कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यातही असे गुन्हे घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी प्रत्येक परिमंडळात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जागरुकता मोहिम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
‘आभासी अटक’ अशी पद्धत देशातच काय तर जगभरात उपलब्ध नाही. कुठल्याही कायद्यात अशी तरतूद नाही.त्यामुळे अनोळखी व्हिडिओ कॉल न उचलणे वा अजाणतेपणे असे कॉल उचलले तरी पैशाची मागणी पूर्ण न करणे याद्वारे कथित ‘आभासी अटक’ पद्धतीला बळी पडणार नाही, अशा आशयाची जागृती सायबर गुन्हे विभागाचे पथक प्रत्यक्ष घरी जाऊन करीत आहे. मुंबईत पाच प्रादेशिक विभाग असून प्रत्यक विभागात सायबर गुन्ह्याच्या वाढत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी प्रशिक्षित अधिकाऱ्यांचा स्वतंत्र विभागा कार्यान्वित करण्यात आला आहे. आभासी अटकेच्या पद्धतीला प्रामुख्याने वयोवृद्ध, महिला, तरुण बळी पडत आहेत. काही प्रकरणात उच्चशिक्षितही फसत आहेत. त्यामुळे केवळ जनजागृती करणे हाच पर्याय असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी घरोघरी जाऊन मोहिम राबविण्याचे ठरविले आहे.
अलीकडे सायबर पोलीस पथकाने परिमंडळ एकमधील ६२६ ज्येष्ठ नागरिकांचे घरी जाऊन प्रबोधन केले. आभासी अटक हा प्रकारच अस्तित्त्वात नाहीत, असे बिंबविण्यात आले. या फसवणुकीपासून रोखण्यासाठी कुठली काळजी घेतली जावी, याची माहिती पुस्तिक देण्यात आली. असा प्रकार घडलाच तर प्रसंगी १९३० किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला.
याशिवाय विविध प्रकारचे सायबर गुन्हे घडत असून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मे २०२२ मध्ये हेल्पलाईन सुरु केली होती. आतापर्यंत एक लाखाहून अधिक तक्रारी या हेल्पलाईनवर नोंदल्या गेल्या आहेत. फसल्या गेलेल्या तक्रारदारांचे सुमारे २४१ कोटी रुपये रोखण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.
पोलीस, सीबीआय, कोर्ट अधिकारी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉल करुन तुमच्यावर गुन्हा दाखल आहे, असे सांगून सुरक्षित खात्यात पैसे पाठविण्यास भाग पाडले जाते. बनावट एफआयआर, कोर्ट ऑर्डर, पोलीस आयडी कार्डचा वापर केला जातो. अशा वेळी अनोळखी नंबरवरून आलेला कॉल/मेसेजला उत्तर न देणे हाच पर्याय आहे – संजय शिंत्रे, पोलीस उप महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर, मुंबई




