
“अंबरग्रीस”विषयी संशोधन आणि लोकाभिमुख धोरण आवश्यक : डॉ. केतन चौधरी

रत्नागिरी : येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या वर्धापनदिन निमित्त “अंबरग्रीस जनजागृतीसाठी विचार मंथन” (Brain-storming on Ambergris) ही कार्यशाळा घेण्यात आली.

या केंद्राला भेट देणाऱ्या मत्स्य व्यावसायिकांनी “अंबरग्रीस विषयावरील विचार मंथन” या विषयावर कार्यशाळा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. म्हणूनच केंद्राच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आणि आसमंत फाउंडेशन, रत्नागिरी यांच्या आर्थिक सहाय्याने ही एकदिवसीय विचारमंथन सभा घेण्यात आली. यामध्ये सुमारे ४० शास्त्रज्ञ, मत्स्य व्यावसायिक, वन विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, युनडीपी प्रकल्पाचे अधिकारी, मान्यवर संस्थाचे अधिकारी सहभागी झाले होते.

स्पर्म व्हेलच्या उलटीला अंबरग्रीस असे म्हटले जाते. व्हेल (जलचर प्राणी) संरक्षित असल्याने त्याची उलटी सुद्धा भारतात “संरक्षित” मानली जाते. व्यावसायिक बाजारपेठेत या अंबरग्रीसला मोठी किंमत आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत अंबरग्रीस “संरक्षित” आहे, तर इंग्लंड, न्यूझीलंड, फ्रांस इत्यादी देशांमध्ये व्हेल “संरक्षित” आहे पण अंबर ग्रीस “संरक्षित” नाही.

कोकण किनाऱ्यावर अंबरग्रीस आढळून येण्याच्या काही घटना घडलेल्या आहेत. याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे, संशोधनाचे मुद्दे कोणते असावे, तसेच लोकाभिमुखी धोरण कसे असावे याविषयी विचार मंथन करण्यासाठी ही कार्यशाळा घेतल्याचे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व प्रमुख डॉ. केतन चौधरी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून तसेच, राज्यगीत, कोंकण कृषी विद्यापीठ गीत आणि वंदे मातरम गायनाने करण्यात आले.
अभिरक्षक डॉ. हरीश धमगये यांनी प्रस्तावना केली. प्रा. डॉ. आसिफ पागरकर यांनी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचा इतिहास आणि कार्याची माहिती दिली. मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जे. दि. सावंत आणि सृष्टी कन्झर्वेशन फाउंडेशन, रत्नागिरी आणि आसमंत फाउंडेशन, रत्नागिरीचे प्रतिनिधी डॉ. विशाल भावे यांनी मार्गदर्शन भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे यांनी या कार्यक्रमातून मत्स्यव्यावसायिक आणि लोकांमध्ये या कार्यक्रमातून अंबरग्रीसबाबत नक्कीच जनजागृती निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली. रेंज फॉरेस्ट ऑफिसर किरण ठाकूर यांनी अंबरग्रीस बाबत भीती न बाळगता, सापडल्यास १९२६ या हेल्प लाईन नंबरवर किंवा ‘जलचर’ या मोबाईल ॲप वर कळविण्याचे आवाहन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी अंबरग्रीसबाबत कायद्याची भीती न राहता, अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. त्यासाठी ज्याला अंबरग्रीस मिळेल त्याला बक्षीस रूपात शासनाकडून काही तरी मोबदला मिळाला, तर कायद्याची भीती न राहता कायद्याची उत्तम अंमलबजावणी होईल, अशी आशा व्यक्त केली.
तांत्रिक सत्रामध्ये सीएमएफआरआय (मुंबई विभाग) डॉ. अजय नाखवा यांनी ‘भारतातील सागरी सस्तन प्राण्यांच्या साठ्याचे मूल्यांकन’ यावर ऑनलाईन प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. प्रा. नरेंद्र चोगले यांनी अंबरग्रीसबाबत माहिती आणि नवीन प्रस्तावित संशोधन याबाबत माहिती दिली. किरण ठाकूर यांनी ‘वाईल्डलाईफ प्रोटेक्षण ॲक्ट, १९७२ मधील अंबर ग्रीस संबंधी नोंदी आणि कायदेविषयक स्थिती’ याबाबत मार्गदर्शन केले. पत्रकार महेंद्र पराडकर यांनी ‘अंबर ग्रीस बाबत स्व-अनुभव आणि पत्रकारांची भूमिका’ मांडली.
प्रा. सचिन साटम यांनी “अंबर ग्रीस : संशोधन आढावा” याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर ‘अंबर ग्रीस: पर्यावरण पूरक लोकोपयोगी शासन भूमिका’ यावर खुली चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व सहभागीनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
शेवटी सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. विचारमंथन सभा आसमंत फाउंडेशन यांच्या आर्थिक सहाय्याने आयोजित करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे विशेष मार्गदर्शन लाभले.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. आसिफ पागारकर, अभिरक्षक प्रा. डॉ. हरिष धमगये, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, श्रीमती व्ही. आर. सदावर्ते, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीमती ए. एन. सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक रमेश सावर्डेकर, कार्यालय अधीक्षक श्रीकांत तांबे, मत्स्यालय यांत्रिक मनिश शिंदे, वरिष्ठ लिपिक श्रीमती जे. जे. साळवी, लिपिक सचिन पावसकर, बोटमन दिनेश कुबल, शिपाई सुहास कांबळे व राजेंद्र कडव, मजूर सचिन चव्हाण, क्षेत्र संग्राहक प्रवीण गायकवाड, तेजस जोशी, प्रशांत पिलणकर, योगेश पिलणकर, स्वप्नील आलीम, अभिजीत मयेकर, केतन चव्हाण यांनी परिश्रम घेतले.




