
हत्ती नदीतील विद्युत मोटरपंप सोंडेने ओढत असल्याने त्याला रोखण्यासाठीच फटाके फोडण्यात आल्याचे वनविभागाकडून खुलासा
तेरेखोल नदीपात्रात हत्ती आंघोळ करत असताना त्याच्यावर सुतळी बॉम्ब फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पर्यावरण प्रेमीत तीव्र संतापाची लाट उसळली. यावर वनविभागाकडून खुलासा करण्यात आला असून हा प्रकार हत्तीला त्रास द्यायचा नसून हत्ती नदीतील विद्युत मोटरपंप सोंडेने ओढत असल्याने त्याला रोखण्यासाठीच फटाके फोडण्यात आल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले.तसे केले नसते तर हत्तीला विजेचा धक्का लागला असता असेही वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सध्या हत्ती सावंतवाडी तालुक्यातील बांदा परिसरात असून तो फळबागेत, शेतात वावरताना दिसतो. २ नोव्हेबर रोजी इन्सुली परिसरात भात शेती तसेच केळी बागायतीचे नुकसान करुन तेरेखोल नदीपात्रातून किनारी आला होता. येथे सुर्यकांत महादेव दळवी याच्या मालकीच्या विद्युत मोटरपंपाचा पाईप सोंडेने ओढत असल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे मोटर विदयुत उपकरणासह पाण्यात पडण्याची शक्यता होती. त्यामुळे ओंकार हत्तीस जिवीतहानी होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.यामुळे कोणतीही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पाण्यात हत्ती पासून काही अंतरावर फटाके वाजविणेत आल्याचा खुलासा वनविभागाकडून करण्यात आला आहे. यात हत्तीला इजा किंवा हानी होणार नाही याची दक्षता घेत असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.




