
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षक बदल्यांबाबत मोठा गोंधळ
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षक बदल्यांबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी दिलेल्या सातव्या टप्प्यातील बदली आदेशानंतर केवळ काही दिवसांतच शिक्षण विभागाकडून तो आदेश स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ८९ शिक्षकांच्या बदल्या थांबल्या असून, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे.
दि. १७ ऑक्टोबर रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. काही शिक्षकांनी दुसर्याच दिवशी दि. १८ ऑक्टोबर रोजी नव्या शाळेत हजर होऊन कामकाज सुरू केले, तर काहींनी अर्जित रजा दाखल करून हजर होणे टाळले. कारण, त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार होत्या. या दरम्यान काही शिक्षकांनी ’बदली रद्द करता येईल’ या अपेक्षेने पडद्यामागे हालचाली केल्याचे बोलले जात आहे.
यानंतर काही दिवसांनी दि. २७ ऑक्टोबरला शिक्षण विभागाकडून अचानक स्थगिती आदेश काढण्यात आला. त्यामुळे हजर झालेल्या आणि न झालेल्या शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. काही ठिकाणी नव्या शाळेत कार्यरत शिक्षकांना परत मूळ शाळेत बोलावण्याचे फतवे जारी करण्यात आले. त्यामुळे कार्यमुक्त करणार्या आणि हजर करून घेणार्या दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांना अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com




