
चिपळूण येथे बहाद्दूर शेख नाका परिसरात ठार मारण्याची धमकी देत तीन तरुणांनी मोबाईल चोरला
ठार मारण्याची धमकी देत तिघांनी फोन पे ऍपचा पासवर्ड विचारून मोबाईल चोरल्याची घटना शहरातील बहादूरशेख नाका येथे सोमवारी घडली. एखाद्या फिल्मी स्टाईलने घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिघांवरही चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष हे तिघेजण २२ वयोगटातील आहेत.
साहिल संतोष साळवी (२२, कोंढे), आकाश राजेश पवार (२२), प्रवीण प्रमोद पवार (२२, दोघे-मिरजोळी) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याची फिर्याद कृष्णा महादेव राठोड (२३, विजापूर) याने दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, कृष्णा राठोड व त्याचा मित्र विशाल वालीकर है दोघे बहादूरशेख नाका येथे बोलत होते. असे असताना साहिल साळवी, आकाश पवार, प्रवीण पवार हे तिघेजण एका लाल रंगाच्या दुचाकीवरून आले व त्यांनी कृष्णा राठोडला मारहाण करुन त्याला ठार मारण्याची धमकी देत त्याचा फोन पे ऍपचा पासवर्ड विचारुन त्याचा २५ हजार किंमतीचा मोबाईल हिसकावून चोरला.www.konkantoday.com




