
अश्विनी मोरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार घोषित
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविका अश्विनी पवनकुमार मोरे यांना २०२०-२१ चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार घोषित झाला आहे.
“भाकर” ही गेली ३२ वर्ष कोकणात अविरत काम करणारी संस्था असून संस्थेच्या श्रीमती मोरे या संस्थेच्या सचिव म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी लहान असतानाच या संस्थेच्या उभारणीच्या काळात मदत केली आहे. पुढे त्या संस्थेच्या प्रत्येक कार्यात हिरीरीने भाग घेऊ लागल्या. आई (स्वर्गवासी) अरुणा पाटील यांनी समाजसेवा करत राज्य शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त करताना केलेल्या समाजसेवेची व परिश्रमाची जाण ठेवत आईचा वारसा चालवण्याचा ध्यास घेत संस्थेच्या कामकाजाला गती दिली.
संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी १५ पदयात्रा काढल्या. महिला बचत गट, माता व बाल संगोपन, गुजरात भूकंप, दुष्काळात चारा छावनी, कोविड, चिपळूण पूर तसेच महिलांचे ३५ हून जास्त महिला मेळावे घेतले. पुढे जाऊन महिला पुनर्वसन केंद्र व आजी आजोबाचा गाव आदी प्रकल्प उभे करून स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केले.
संस्थेचे काम करताना वाणिज्य शाखेची मुंबई विद्यापीठातून प्रथम वर्गाची पदवी मिळवलेली. पुढे एमएसडब्ल्यू ही समाजसेवेची पदवीत्तर पदवी मिळवली. पुढील तीन वर्ष म्हाडामध्ये झोपडपट्टी विकास कार्यक्रमात काम केले. बाहेर उत्तम पगाराच्या नोकरीची संधी उपलब्ध असूनही आजही अल्पशा मानधनावर त्या समाजसेवेचे कार्य करीत आहे.
सन २०१२ मध्ये पुन्हा “भाकर” या आई-वडिलांनी स्थापन केलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कोकणातील गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करावे याचे ध्येय उराशी बाळगून त्यांनी कामाला सुरुवात केली. संस्थेच्या समुपदेशक, केंद्रप्रशासक, केंद्र समन्वयक म्हणून काम करीत आजवर आठशे हून अधिक पीडित महिलांना मदत केली. सध्या त्या राज्य महिला आयोगाच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक, सखी वन स्टाँप सेंटरच्या (रत्नागिरी) केंद्रप्रशासक, जीएफ कंपनीतील पॉश कमिटी सदस्य, अधिकारी कार्यालयातील व्यसनमुक्ती समितीच्या सदस्य रत्नागिरी जिल्हा व महिला बालकल्याण विकास समितीच्या रत्नागिरी विभागाच्या सदस्य आदी पदांवर कार्यरत आहेत.
“भाकर” संस्था शासनाचा स्वच्छ भारत मिशन, आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण प्रकल्प, महिला व बालकांसाठी समुपदेशन केंद्र, पाणलोट विकास कार्यक्रम, हस्तकला कारागिरांचे प्रशिक्षण प्रकल्प, सखी सेंटर, सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास अहवाल, वृद्धाश्रम (आजी-आजोबांचे गाव) महिला पुनरुत्थान केंद्र इत्यादी प्रकल्प कार्यक्रम राबवित आहे.
भविष्यात समाजशास्त्र महाविद्यालय, रात्र महाविद्यालय, आयुर्वेदिक हॉस्पिटल सुरू करण्याचा त्यांचा मानस असून, त्यादृष्टीने त्यांचे काम सुरू आहे.




