
संगमेश्वरची सुकन्या डॉ. सायली जाधव यांची शिक्षण विस्तार अधिकारीपदी नियुक्ती
संगमेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त, ठाणे यांनी डॉ. सायली विजय जाधव यांची शिक्षण विस्तार अधिकारीपदी डहाणू (जि. पालघर) येथे नियुक्ती केली आहे.
सध्या डॉ. सायली जाधव कृषी विभागात कार्यरत असून, त्यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून अधिदान व लेखा कार्यालय (वित्त विभाग, बांद्रा, मुंबई) तसेच उपनिबंधक, सहकार विभाग (कांदिवली, मुंबई) या पदांसाठीही निवड मिळवलेली आहे.
डॉ. सायली यांनी हे यश महाराष्ट्र राज्याचे समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव आदरणीय डॉ. हर्षदीप कांबळे (IAS) यांच्या सततच्या प्रोत्साहन आणि प्रेरणेमुळे साध्य केल्याचे नमूद केले आहे.
लायन्स क्लब ऑफ लोटेचे माजी अध्यक्ष विजय जाधव यांची डॉ. सायली ही कन्या असून, त्यांचे मूळ गाव बामणोली (ता. संगमेश्वर) आहे.
डॉ. सायली यांचे प्राथमिक शिक्षण आठवीपर्यंत चिपळूण येथील ख्रिस्त ज्योती व परशुराम शाळेत झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वच स्तरातील मंडळींनी अभिमान व्यक्त केला असून डॉ. सायली जाधव यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




