
शंकरवाडी वसाहतीला अखेर रस्त्याचा श्वास!
शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या पुढाकाराने काही तासांत झाला रस्ता
चिपळूण : शहरातील शंकरवाडी येथील नवीन वसाहतीतील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांची रस्त्याची समस्या अखेर सुटली आहे. तब्बल २०१७ पासून या वसाहतीतील सुमारे साठ ते सत्तर रहिवासी चिखलातून, गवतातून तुडवत प्रवास करत होते. सात-आठ कुटुंबांना शाळा, कामधंदा आणि दैनंदिन गरजांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
गेल्या काही वर्षांपासून स्थानिक पातळीवर रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू असला, तरी प्रत्यक्षात काहीच काम झाले नव्हते. अखेर या नागरिकांनी शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्याशी संपर्क साधला. परिस्थिती समजून घेताच सकपाळ यांनी तात्काळ कार्यवाई करत फक्त काही तासांत या ठिकाणी चालण्यायोग्य खडी टाकून कच्चा रस्ता तयार करून दिला.
शुक्रवारी सकाळी या ठिकाणी प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यात आले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या वेळी श्री. सकपाळ म्हणाले, “शंकरवाडीतील नागरिकांनी अनेक वर्षे या मूलभूत सुविधेसाठी प्रतीक्षा केली. नगर पालिकेच्या माध्यमातून येत्या काळात येथे कायमस्वरूपी रस्ता बांधण्यासाठी निधी खर्च केला जाईल.”
या ठिकाणी असलेल्या सात-आठ कुटुंबांच्या वतीने रामचंद्र लोटेकर यांनी सकपाळ यांचे आभार मानले आहेत. स्थानिक नागरिकांनी या जलद कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत शिवसेना नेतृत्वाचे विशेष कौतुक केले आहे.




