
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
पुढच्या वर्षी राज्यात मेगा सरकारी नोकरभरती अत्यंत पारदर्शक व गतिशील पद्धतीने करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.अनुकंपा तत्त्वावरील ५,१८७ आणि एमपीएससीमार्फत नियुक्त ५,१२२ अशा एकूण १० हजार ३०९ उमेदवारांना नोकरीची नियुक्तीची प्रमाणपत्रे देण्याचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्री व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्य सरकारने अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित ८० टक्के प्रकरणात नोकऱ्या दिलेल्या आहेत. उर्वरित २० टक्के नोकऱ्या चार महिन्यांत देण्यात येतील, अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. एमपीएससीमार्फत होणारी नोकर भरती बरेचदा रेंगाळते त्यात तीन-चार वर्षे निघून जातात; मात्र यापुढे ही भरती वेगवान पद्धतीने केली जाईल. व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्यासाठी अभ्यास केला आहे. वेगवान भरतीची पद्धत येत्या काही महिन्यांत निश्चित केली जाईल आणि पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.




