
देवरुख शहरातील सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर अपहरणप्रकरणी आणखी एकास बदलापूर येथून अटक
देवरुख शहरातील सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर अपहरणप्रकरणी देवरुख पोलीस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरत सोमवारी रात्री ठाणे बदलापूर येथून आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीकडून सोन्याची लगड व ४ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. यामुळे अटक केलेल्या आरोपींची संख्या ७ झाली आहे. देवरुख पोलिसांच्या धडक कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
देवरुख येथे सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर हे चारचाकी वाहनाने १७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास साखरपाहून देवरुखच्या दिशेने परतत असताना वांझोळे येथे अज्ञातांनी अपहरण केले होते. त्यांच्याकडील १४ लाखाचे दागिने व २० हजार रुपये रक्कम काढून घेत त्यांना वाटूळ येथे सोडले. केतकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञातांवर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अल्पावधीतच सहा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
www.konkantoday.com




