
स्पोर्टस फाॕर वुमेन योजनेत सहभागी व्हावे
रत्नागिरी, दि. २५ ) : महिला खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत अस्मिता स्पोर्टस फाॕर वुमेन योजना 2021-22 पासून राबविण्यात येत असून, महिला खेळाडूंना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देणारी महत्वाकांक्षी योजना ठरत आहे. तरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातील महिला खेळाडूंनी ASMlTA – Sports for Women या खुल्या व्यासपीठाद्वारे आयोजित होणाऱ्या क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन प्र.जिल्हा क्रिडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत देशभरातील 28 राज्यांमध्ये तसेच केंद्रशासित प्रदेशामध्ये आतापर्यंत 1 हजार 390 हून अधिक अस्मिता महिला लीग यशस्वीरीत्या पार पाडल्या असून 500 हून अधिक शहरामध्ये 1 लाखहून अधिक महिलांनी 29 क्रिडा प्रकारात सहभाग घेतला आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात 15 हून अधिक क्रीडा प्रकारांमध्ये अनेक राष्ट्रीय क्रीडा संघामार्फत 1 हजारहून अधिक अस्मिता लीग आयोजित करण्याचे नियोजन असून 70 हजारहून अधिक महिला खेळाडूंना सहभागी करुन घेण्याचे सामूहिक लक्ष्य आहे. सायकलिंग, वेटलिफ्टींग, योगासन, तायक्वांदो, फुटबॉल, बॅडमिंटन, रग्बी, वुशू, किकबॉक्सींग, पिंच्याक सिलट, ज्युदो, कनोईंग व कयाकिंग अशा प्रकारचे खेळ आहेत.
ASMlTA – Sports for Women ही स्पर्धा सर्व महिलांसाठी खुली आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांना स्पर्धेस जाण्यास व येण्यास हातखर्ची भत्ता, क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक व फिजीओ यांना शिबीराकरिता जाण्याचा व येण्याचा प्रवासखर्च व मानधन देण्याची तरतूद केंद्र किंवा राज्य शासनाकडून केली जाणार नाही.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.
000




