
मालवण कसाल रस्त्यावर आराम बस आणि मोटरसायकल यामध्ये झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार ठार
मालवण कसाल या रस्त्यावर रानबाबुळी येथे आराम बस आणि मोटरसायकल यामध्ये झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार गणेश चंद्रकांत घोगळे राहणार वराड तालुका मालवण हा 28 वर्षीय तरुण जागीच ठार झाला तर त्याच्यामागे बसलेली तरुणी जखमी झाली आहे.या अपघातामुळे परिसरातील ग्रामस्थांनी अपघात स्थळी धाव घेतली. मोठा जमाव जमल्यामुळे वातावरण तंग झाले. पोलिसांनाही मोठा बंदोबस्त मागवावा लागला. आमदार निलेश राणे यांनी समन्वयकाची भूमिका घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
मालवण कसाल या रस्त्यावर मालवणहून मुंबईच्या दिशेने जाणारी आराम बस क्रमांक एम पी 41 झेड जे ७४१० ही रानबांबुळी फाट्या जवळील अवघड वळणावर आली असता समोरून कसाल वरून वराडच्या दिशेला जाणारी सुझुकी जिक्सर मोटरसायकल क्रमांक एम एच ०७ एटी 88 78 ही आली या मोटर सायकलची आराम बसला धडक बसली आणि मोटर सायकल स्वार गणेश हा रस्त्यावर कोसळला त्याच्या अंगावरून बस गेली तर त्याच्या पाठीमागे बसलेली रुची राजन वालावलकर रा गावराई तालुका कुडाळ वय वर्षे 24 ही रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. त्यामुळे ती वाचली तिला किरकोळ जखमा झाल्या. तर मोटरसायकलला वाचवण्याच्या नादात आराम बस रस्त्याच्या खाली उतरली यामुळे आराम बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले या सर्वांवर सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले




