
राणे कुटुंबाने सिंधुदुर्गात जेवढी माणसं मारली तेवढी हिंदूच होती, अविनाश जाधवांची नितेश राणेंवर बोचरी टीका
मीरा-भाईंदर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचं उदघाट्न केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेवरून गरळ ओकणाऱ्यांना गर्भित इशारा दिला.महाराष्ट्रात राहताय शांतपणे रहा, मराठी शिका, आमचं काही भांडण नाही तुमच्याशी, पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, अशा शब्दात सुनावले. त्यांच्या या भूमिकेनंतर मराठीचा मुद्दा हिंदू आणि धार्मिक वादाशी जोडण्याचा प्रयत्न मंत्री नितेश राणे यांनी केला. यानंतर आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात राणे कुटुंबावर तोफ डागली आहे.
अविनाश जाधव म्हणाले की, सिंधुदुर्गमध्ये जेवढे खून झाले ते कानडी होते का? तमिळ होते की ख्रिश्चन होते? ती सगळी कुटुंब हिंदू मराठी होते, सगळेच हिंदू होते. त्यावेळी वडिलांना का नाही सांगितलं हिंदूचा खून करतोय म्हणून? अशी विचारणा अविनाश जाधव यांनी केली. ते पुढे म्हणाले की, कोणाच्या सांगण्यावर बोलता, बोलताना एकदा तरी विचार करा आपण काय बोलत आहोत. किती दिवस भांडी घासणार? पदं टिकवण्यासाठी भांडी घासणार आहात? विचार न करता समोरची स्क्रीप्ट वाचतोय, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.नितेश राणे यांनी मीरा रोडच्या नया नगर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानले जात नाही. तिथल्या गोल टोपी वाल्यांच्या तोंडून मराठी कधी निघणार? अशी विचारणा केली होती. यानंतर संदीप देशपांडे यांनी सुद्धा पलटवार नितेश राणे यांना फटकारले होते. सगळ्या गोष्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार असेल तर मंत्री म्हणून मिरवणारे नितेश राणे काय करणार? ते पंखा हलवणार का? अशा शब्दात खिल्ली उडवली होती