
नॉर्वेसारख्या देशांच्या फिश फार्मिंग तंत्रज्ञानाचा उपयोग महाराष्ट्रातील मत्स्यशेतीला आधुनिक बनवण्यासाठी केला जाणार-नितेश राणे.
नॉर्वेसारख्या देशांच्या फिश फार्मिंग तंत्रज्ञानाचा अभ्यास सुरू असून, त्यांचा उपयोग महाराष्ट्रातील मत्स्यशेतीला आधुनिक बनवण्यासाठी केला जाणार आहे. किनारपट्टीवर शाश्वत विकास आणि गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाचा विकास हे दोन मुख्य आधारबिंदू मानून काम सुरू आहे, अशी माहिती मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी विधानपरिषदेत शुक्रवारी 260 अन्वये चर्चेला उत्तर देताना केली.
गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाला बळकटी देण्यासाठी ‘एआय’ प्रणालीच्या माध्यमातून तलावांतील मासळीचे उत्पादन, तलावांमध्ये साचलेला गाळ व इतर बाबींचे डिजिटल विश्लेषण सुरू आहे. तलाव भाडेपट्ट्यांबाबतही पारदर्शक माहिती मिळेल यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. सागरी सुरक्षा आणि मत्स्य उत्पादन वाढीचे हे दुहेरी धोरण राबवले जात आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मंत्री राणे म्हणाले, सागरी सुरक्षेसाठी ड्रोन व गस्ती नौकांच्या माध्यमातून अवैध मासेमारी व अतिक्रमणावर नियंत्रण ठेवले जात आहे.