
आरे वारे समुद्र किनारी मोठी दुर्घटना, खवळलेल्या समुद्रात चार जणांचा बुडून मृत्यू
रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावर असलेल्या आरे वारे बीचवर आज सायंकाळी मोठी दुर्घटना घडली असून खवळलेल्या समुद्रा त उतरलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे
ठाणे मुंब्रा येथून पर्यटनासाठी आलेल्या चौघांपैकी तिघी महिला आणि एका पुरुषाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
, ठाणे मुंब्रा येथील उज्मा शामशुद्दीन शेख (वय १८) व उमेरा शामशुद्दीन शेख (वय २९) या बहिणी काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील नातेवाईकांकडे आल्या होत्या. शनिवारी त्यांनी स्थानिक नातेवाईक जैनब जुनैद काझी (वय २६) आणि जुनैद बशीर काझी (वय ३०, रा. ओसवाल नगर, रत्नागिरी) यांच्यासोबत आरेवरे समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला.
सायंकाळी सुमारे पाच वाजता समुद्र किनाऱ्यावर पोहोचलेल्या चौघांनी पावसाळी हवामान असूनही समुद्रात उतरून खेळण्यास सुरुवात केली. मात्र, समुद्र खवळलेला असतानाही लाटांचा अंदाज न घेता पाण्यात गेलेल्या चौघांना अचानक उसळलेल्या मोठ्या लाटांनी खेचून नेले. काही वेळ एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न झाला, आरडाओरड सुरू झाली, पण काही उपयोग झाला नाही.
ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिक तत्काळ धावून आले. त्यांनी बचावकार्य सुरू केले, परंतु समुद्रातील वेगवान प्रवाहामुळे प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटी सायंकाळी सातच्या सुमारास चौघांचे मृतदेह समुद्रकिनारी सापडले.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि बचाव पथकाने तत्काळ पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले.
*