
मरावे परी किर्तीरुपी उरावेबहुजनांचे कार्यकर्ते : सी. के. बोले जयंती वर्ष 156 वे.
सिताराम केशवराव बोले यांचा जन्म कोकणातच 29 जून 1869 रोजी त्यांच्या आजोळी पालशेत येथे झाला. एकूण तीन महिनेच पालशेतला होते. त्यानंतर त्यांची आई यशोदा त्यांना मुंबईत घेऊन आल्या. सिताराम यांचे वडील केशवराव मुंबईत स्थायिक झालेले होते. नागपाडा आणि डोंगरी येथील शाळांमधील त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. वयाच्या सहाव्या वर्षापासून प्राथमिक शिक्षण सुरु होताच अभ्यासात ते रमून गेले. धोतरबंडी, काळीटोपी घालणारे सिताराम यांना दगडी पाटी आणि पेन्सील या अभ्यासाच्या वस्तू आवडत असत. चौथीपर्यंत इतिहास, भूगोल, गणित या विषयांचे शिक्षण त्यांनी घेतले व नागपाडा येथे घरा शेजारीच असलेल्या बाजी शेट्ये यांच्या शाळेत ते प्रथम शिकले व त्यानंतर डोंगरी येथील श्रीधरपंत यांच्या शाळेत रमले.त्यावेळच्या पद्धतीनुसार सिताराम यांचा विवाह लवकर झाला. लक्ष्मी पांडुरंग मयेकर या त्यांच्या अर्धांगिनी झाल्या.
लक्ष्मी यांचे वय त्यावेळी 9 ते 10 वषें होते. तर सिताराम यांचे वय 14. गिरगांवात होणार्या व्याख्यानमालेत झालेल्या न्यायमूर्ती तेलंग यांच्या व्याख्यानाचा परिणाम सिताराम यांच्यावर झाला. समाज प्रबोधन, समाजकार्याची बैठक यांच्या मनात एकूण पक्की होत गेली. माध्यमिक शाळेत असताना त्यांनी जुना नागपाडा येथे ज्ञानवर्धक मंडळी नावाची एक संस्था काढली. अनेक नामवंत वक्त्यांची व्याख्याने मंडळाने आयोजित केली. स्वत: सिताराम बोले यांनी सभेत बोलण्याचा प्रारंभ येथेच केला. होळीत होणार्या गैर प्रकारांना थांबविण्यासाठी त्यानी खेळांचे सामने भरविले. एकंदरीतच समाजसुधारणांच्या कामांना प्रारंभ केला. मॅट्रीकच्या शिक्षणासाठी त्यांनी विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. याचवेळी गरीब मुलांसाठी त्यांनी रात्रीची शाळा चालविली. त्यात त्यांनी स्वत: शिक्षकाचे काम केले. मोफत शिक्षण देणारी ही शाळा काही काळाने बंद पडली, तर सिताराम यांची धडपड सर्वांच्याच लक्षात आली. याच काळात त्यांचे डोळे अचानक बिघडले. त्यांना चष्मा लावाला लागला. त्याचा उपयोग वाचनात, वर्गात करीत होते. सुट्टीच्या दिवशी आजोळी पालशेत येथे येत असत. तेथील अस्पृश्यांना जाती-पातीच्या दरी , अन्याय पाहून त्यांना दु:ख होत असे. सामाजिक विषमतेमुळे त्यांना संतापही येत असे. धर्म व शिक्षणाचा अभाव यामुळे समानता जातीपातीच्या उतरंडीवर निर्माण झाल्या आहेत, हेही त्यांच्या लक्षात आले. इंग्रजी विद्या, शिक्षण, व्यापार याचा फायदा काही विशिष्ठ मुठभरांनीच घेतला आणि त्याचा उपयोग करुन ते समाजातील अन्य वर्गावर वर्चस्व गाजावतात हे लक्षात आले.
सीताराम बोले यांनी सन 1889 मध्ये मॅट्रीक पास झाल्यानंतर मित्रांच्या सहकार्याने कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या नावाने संस्था सुरु केली. तिचा जाहीरनामा काढून सर्व वस्त्यामध्ये वाटला. आज जरी जातीच्या नावाने संस्था काढणे, या गोष्टी महत्वाच्या समजल्या जात नसल्या तरी त्यावेळी मात्र त्यांला प्रतिष्ठा होती. बोले साहेबांचा जाहीरनामा वाचला तर ते भंडारी हितवादीच नव्हते तर बहुजन हितवादी होते. कनिष्ठ जातींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले तरच त्यांची सुधारणा होणार हे मत त्यांनी मांडले. मॅट्रीक झाल्यानंतर दोन वर्षानंतर त्याना अबकारी खात्यात नोकरी मिळाली. परंतु या नोकरीमुळे भंडारी ज्ञातीतील लोकांशीच सतत संघर्ष होण्याची वेळ आली. नंतर त्यांनी त्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. 20 मे 1891 रोजी त्याना पुत्ररत्न झाले. त्यांचे गाव त्यांनी विश्वनाथ ठेवले. सन 1893 च्या लढ्यात त्यांचे वडील जखमी झाले आणि वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले.
1894 मध्ये बोलेंच्या पत्नी निवर्तल्या. विश्वनाथाची जबाबदारी आली. तरुणपणात पत्नी वियोगाचे दु:ख त्यांना सोसावे लागले. मुंबईतल्या प्लेगच्या साथीत त्यांनी सरकारी अधिकार्यांना मदत केली. सामान्य जनतेला स्वच्छता वैद्यकीय उपचार यांचे महत्व पटवून दिले. ब्रिटीश पोलीस, डॉक्टर साथींच्यानिमित्ताने चाललेल्या दडपशाहीला विरोध करावयाचा अशी तारेवरची कसरत त्यांनी केली. प्लेग प्रतिबंधक मोहिमेत त्यांनी स्वत:ला लस टोचून घेतली. त्यामुळे अनेक नागरीकांनी लस टोचून घेतली. त्यांनी स्वयंसेवकाचे काम करुन अनेकांची सेवा केली. साथ संपल्यानंतर 1897 मध्ये त्यांचा द्वितीय विवाह झाला. द्वितीय पत्नीचे नावही लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. त्या इंग्रजी तिसरीपर्यंत शिकलेल्या होत्या. रघुनाथतात्या पावसकर यांच्या त्या कन्या होत. बोले सोहबांचा मुलगा विश्वनाथ यालाही त्यांनी अतिशय प्रेमाने वाढविले. 1902 बाबासाहेबांचे बंधू विनायकराव मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीला लागले. त्यांनी बाबासाहेबांना सार्वजनिक काम करण्यास मोकळीक दिली व प्रोत्साहनही दिले. घरची जबाबदारी घेतल्याने बाबाहेबांना पूर्ण मोकळेपणाने समाजकार्य करता आले. त्यांची भूमिका स्पष्ट होती. त्यांनी अगदी टिळकांनाही विरोध केला. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष भेटीत टिळकांनाही बाबासाहेबांपुढे माघार घ्यावी लागली. बाबासाहेबांना महात्मा फुले, समाज सुधारक आगरकर, गोपाळकृष्ण गोखले यांच्यविषयी आदर होता. प्राथमिक शिक्षण सर्व मुलांना मोफत मिळावे यासाठी ते धडपडत होते. ही मागणी प्रथम ज्योतिराव फुले यांनी 1880 मध्ये केली. मागणीला होकार मिळाला नाही.
1908 मध्ये ते रजिस्टार ऑफ पीस (जे. पी.) झाले.सन 1907 मध्ये बाबासाहेब आंबेडकर मॅट्रीकची परीक्षा पास झाले. त्यांच्या अभिनंदनाच्या सभेचे अध्यक्ष सिताराम बोले होते. या सभेपासून दोन्ही नेत्यामध्ये ऋणानुबंध जुळला तो कायमचा. आंबेडकर मार्गदर्शन घेण्यासाठी अनेकदा बोलेसाहेबांकडे येत होते. मुंबईत प्लेगच्या साथी वारंवार येत होत्या. आरोग्य तपासण्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला अक्षरश: भंडावून सोडले जात असे. स्त्रीयांसाठी या तपासण्या म्हणजे छळच होता. बोले, कोरगावकर, पवार यांनी या संदर्भात राज्यपालांकडे दाद मागितली. अर्जावर विचार करुन सरकारने आरोग्य तपासणी बंद केली. मराठी एैक्येच्छूक सभेच्या कार्यकारीपदी बाबासाहेबांची 1908 मध्ये नेमणूक झाली. आपल्या कारकिर्दीत बोलेसाहेबांनी विद्याप्रसारक निधी वाढविला. महात्मा गांधींसाठी निधी गोळा करण्याच्या मोहिमेतही ते आघाडीवर होते.कामगारवर्गाचे कामही बोलेसाहेब करीत होते. 1910 मध्ये जुना नागपाडा मंडळाचे अध्यक्ष झाले. होलिका संमेलनाला त्यांनी कामगारवर्गाचे संमेलन बोलावले. होळीच्या काळात जी बिभत्स पूजा चालत असे त्याला आवर घालण्यावर या सभेत जोर देण्यात आला.
मद्यपानासंदर्भातही व्याख्याने झाली. व्यसनाचा त्याग करण्याचे आवाहन कामगारांना करण्यात आले. मुंबईतील शिमगोत्सवात चालणारे चालणारे गैरप्रकार थांबविण्याचे श्रेय बाबासाहेबांकडे जाते. शिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांसाठी जास्त शिष्यवृत्त्या ठेवाव्यात अशी प्रथम मागणी बोलेसाहेबांनी केली. 1901 व 1911 च्या मोहिमेत जनगणनेचे त्यांनी अधिक्षक म्हणून काम केले. राज्यपाल लॉर्ड सिडन हॅम यांनी बोलेसाहेबांच्या कामगिरीचा विशेष उल्लेख केला. सम्राट पंचम जॉर्ज यांनी दिल्ली दरबारात शिक्षणासाठी पन्नास लाख रुपयांची रक्कम जाहीर केली. शिक्षणावर विद्यार्थ्यांवर असलेल्या जातीच्या पुढार्यांची 23 डिसेंबर 1912 रोजी टाऊन हॉलमध्ये परिषद झाली. वेगवेगळ्या जातींचे 900 प्रतिनिधी व स्त्रियांचे प्रतिनिधी त्यात होते. अनेक मह्त्वाचे 22 ठराव यामध्ये संमत झाले. बाबासाहेबांच्या सामाजिक कार्यावर या परिषदेमुळे एक प्रकारची मान्यतेची मोहोर उमटली.1918 मध्ये मुंबईत एन्फ्यूएंझाची साथ आली.

बोले यांनी कामगार हितवर्धक सभेच्यावतीने फुकट औषधांचे दवाखाने सुरु केले व या भयंकर साथीच्या काळात लोकांना साह्य केले. त्यानंतर मुंबईत झालेल्या दंगलीत अनेक भागात फिरुन बोले यांनी शांतता स्थापना करण्यासाठी पोलीस आयुक्त व्हिन्सेट यांना मदत केली. 1918 मध्ये बाबासाहेबांचा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथ तथा अण्णा यांना पोट ट्रस्टमध्ये त्यांच्या काकांनी नोकरी लावली. इंटरला कॉलेज सोडल्यानंतर अण्णा यांना नोकरीसाठी राजी केले. नोकरी स्वीकारुन विश्वनाथ यांनी वडीलांना व काकांना सहाय्य करण्याचे व्रत घेतले आणि ते शेवटपर्यंत पाळले. 1919 सेच्युरियन मिलमध्ये गिरणी कामगारांच संप झाला. पगार 25 टक्के वाढवावा अशी मागणी होती. ती मागणी बाबासाहेबांनी राज्यपालांपर्यंत जावून न्याय मिळवून दिला. 1919 च्या ऑगस्टमध्ये वॉशिग्टनला भरणार्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत कोणाला पाठवयाचे यावरुन वाद सुरु झाले. लो. टिळक यांनी बी. पी. वाडिया यांच्या नावाला विरोध केला. त्यानंतर ना. म. जोशी यांचे नाव जाहीर झाले. परंतु अनेक कामगार संघटनांनी जोशींच्या नावाला विरोध केला. बाबासाहेबांचाही त्या नावाला विरोध होता. पुढे वॉशिंग्टन येथे झालेल्या कामगार परिषदेचा राग ओढवून घेतला. यावेळी बाबासाहेबांची कामगारवर्गाविषयी असलेली तळमळ अधिकच दिसून आली. मुंबई विधीमंडळात श्रीमंत, प्रतिष्ठीत, बड्या धेंडांची मक्तेदारी चालत असे. ही मक्तेदारी तोडून काढण्याचा बाबासाहेबांनी भरपूर प्रयत्न केला. त्यांना प्रचंड विरोध झाला. जे 10 रुपये भाडे देतात त्यांनाच मतदानाचा अधिकार द्यावा, अशी मागणी पारशी लॉबीने केली. त्याला बाबासाहेबांनी कडाडून विरोध केला. परंतु 31 जुलै 1922 रोजी 5 रु. भाडे भरणार्यांना मतदानाचा अधिकार हक्क देणारे विधेयक संमत झाले. परंतु हे विधेयक संमत झाल्याबद्दल सरकारचा निषेध करण्यात आला व ठराव 17 ऑगस्ट 1922 रोजी मंजूर झाला.

कामगारांना राजकीय हत्यार म्हणून वापरले जात असल्याबद्दल बाबासाहेबांनी वारंवार खंत व्यक्त केली. अज्ञानी कामगार राजकीय प्रचाराला बळी पडतात व भलत्याच मार्गाने जातात. शेवटी त्यांना दु:ख भोगावे लागते. बाबासाहेब बोले स्वभावाने नम्र, प्रेमळ, निगर्वी होते. पण खंबीर वृत्तीचे व स्पष्टवक्ते होते. कार्यकर्त्यांना ते आपुकीने वागवित. त्यांची काम करण्याची पद्धत साधी नी सरळ. दंभ, दर्प, दुराभिमानहे दुर्गु त्यांच्या ठायी होते. लोकसेवा करताना त्याना स्वार्थ शिवला नाही. कामगार आणि दलित यांच्या हिताचे कार्य बोले यांनी विधीमंडळात जागृत राहून केले. त्यांना जेव्हा जेव्हा कामगारांची आणि दलितांची बाजू मांडाण्याची संधी मिळे तेव्हा ते त्याच्या हितासाठीच प्रयत्न करत.बोले म्हणायचे, जो स्वत:साठी जमिन कसतो तोच शेतकरी. जो शेतकर्यांच्या श्रमावर पोसला जातो तो जमिनदार होवू शकेल, पण त्याला शेतकरी म्हणता येणार नाही. आर्म्हीं समाजसत्तावादी असलो तरी समाज विध्वंसक नाही आणि सारा हिंदुस्थान समाजसत्तावादी झाल्याशिवाय स्वराज्य प्राप्ती लवकर होईल असे आम्हाला वाटत नाही. इतकेच नव्हे तर रशियाप्रमाणे शेतकर्यांना जमिनी वाटून दिल्याशिवाय शेती व शेतकरी यांची केव्हाही सुधारणा होणार नाही.
जुलै 1928 हिंदू समाजात सुरु असलेल्या बुवाबाजीवर व स्वामीबाजीवर बाबासाहेब बोले यांनी फटकारे मारले. 12 ऑगस्ट 1928 रोजी उपास्नी महाराज यांच्या बुवाबाजीवर नवयुगमध्ये अग्रलेख प्रसिद्ध करुन नवयुगकारांनी म्हटले आहे की, मोक्षासाठीच्या बुवाच्या चरणी लोक आपली बायकामुले अर्पण करतात ही भयंकर गोष्ट आहे. अशा अर्पण केलेल्या विवाहित स्त्रीयांवर किंवा कुमारी मुलींवर जर स्वामीजींकडून संतती झाली तरी त्यात कसलेही पाप नाही. अशी विवाहित स्त्री ही पतिव्रता राहते. अशी मुले झालेली कन्याकुमारिका राहते. स्वामींची ही शिकवण भयंकर. साधु स्वामी यांचा रस्तोरस्ती इतका गोंधळ उडाला आहे की या चिखलात पाय टाकल्याखेरीज कोणाला जगात चांलण्यास वाव नाही. कोणी एखादा वीर उत्पन्न होवून, एखाद्या साधूचा समाचार घेतो. पण ही साधुगिरी अखंड चालू आहे. तिला खीळ पडत नाही. साधुगिरी स्वामींबाजू या धंद्याच्या युक्त्या आहेत जोपर्यंत हे जीवंत राहते राहतील तोपर्यंत साधु स्वामी यांचा सुकाळ चालणार. त्यामुळे यांच्यावर घाला घातला पाहिजे. हिंदुस्थानात याना मोडल्याशिवाय जातीभेद जाणे शक्य नाही. सन 1927 च्या मार्च महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या तळ्यावर अस्पृष्य सामजाच्या स्वातंत्र्य लढ्याचे निशाण उभारले. त्यापूर्वी 4 ऑगस्ट 1923 रोजी बाबासाहेब बोले यांनी विधी मंडळात संमत करुन घेतलेल्या ठरावाच्या अनुरोधाने मिळालेले हक्क बजावण्यासाठीच बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळ सुरु केली आणि अस्पृश्यांच्या महाडमधल्या त्या प्रचंड परिषदेत बोले यांच्या ठरावाची सरकारने अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.
चवदारतळ्याच्या त्या प्रचंड परिषदेत उपस्थित असलेल्या अस्पृश्य बंंधुंनी पाणी पिण्याचा आपला हक्क बजावला. धर्म घातकी स्पृश्य गुंडांनी त्याच्यावर महाडातच हल्ले केले. निरपराधी गरीबांना घायाळ केले. स्त्री मुले यांनाही त्या क्रूरकम्यांनी सोडले नाही. मंडपात शिजलेल्या अन्नात त्या क्रूरकर्म्यांनी माती कालवली. पण शेकडो वर्ष निर्माल्यव्रत होवून पडलेला तो अवनत मानेचा अस्पृश्य समाज तळ्यावरील पाणी पिण्याचे आपले हक्क प्रस्थापित करुन स्वाभिमानाने स्वावलंबनाच्या निर्धाराने मान ताठ करुन अन्यायाचा परिहार करण्यासाठी अनेक युगातही प्रथमच दंड थोपटून उभा राहिला. बोले यांनी देवदासी प्रतिबंधक कायदा मंजूर करुन घेऊन समाजसेवेचे मोठे कार्य पार पाडल्याबद्दल आणि आपल्या समाजावर फारमोठे उपकार करुन ठेवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने नाईक मराठा मंडळ, मुंबई व गोमंतक मराठा समाज यांनी 10 फेब्रुवारी 1935 रोजी ब्लॅव्हाटस्की लॉजमध्ये बॅ. बाबासाहेब जयकर यांच्या अध्यक्षतेखाली बोले यांचे जाहीर अभिनंदन केले. त्यावेळी सर्व हॉल भरुन गेला होता.विजयादशमी 25 ऑक्टोबर 1936 रोजी बोलेसाहेबांच्या हस्ते कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळाच्या इमारतीच्या पायाचा दगड गोखले रस्ता दादर येथे बसविण्याचे ठरले होते. त्या दिवशी या जागेवर सुंदर मंडप उभारला होता. उपस्थित मंडळी, ज्ञातीतील प्रमुख व्यक्ती, प्रतिष्ठी व्यक्ती उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष बोले यांच्या हस्ते कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळाच्या इमारतीचा दगड बसविण्यात आला. बोले यांनी 15 वर्षे विधी मंडळातील त्यांच्या कार्याचे धर्माचे मूल्यमापन करताना एक निरीक्षक आपल्या मुंबई कौन्सीलगिरीकरच्या चष्म्यातून या लेखमालेतील 26 मे 1935 च्या लेखात म्हणतात रा. ब. सितारामपंत बोले यांचा नूर मात्र अगदी निराळा आहे. ही व्यक्ती हुशार व चाणाक्षही आहे. कोठे कोणाशी कसे बोलावे, कसे वागावे याचे तारतम्य बोलेसाहेबांकडे 100 टक्के आहे. कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळींच्या सभागृहाची इमारत दादर येथील गोखले रस्त्यावर बांधून झाली. त्या इमारतीचा उद्घाटन समारंभ 4 डिसेंबर 1937 रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईचे राज्यपाल सर रॉजर लॅम्ले यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला. बालवीर पथकाने त्यांना मानवंदना दिल्यानंतर राज्यपालांनी मुख्य दरवाजाचे चांदीचे कुलूप काढून तो उघडला व ते अध्यक्षस्थानी विराजमान झाले. स्वागतपर भाषणात बोले म्हणाले, गेल्या 45 वर्षात लायक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देवून या संस्थेने शिक्षण प्रसाराची व समाजोन्नीतीची इतर कार्ये केली.
त्या समारंभाला अनेक पुढार्यांचे आणि मंत्र्यांचे शुभपर संदेश आले होते.बाबासाहेबांनी आतापर्यंत जवळजवळ 50 वर्षे सेवा केली. सामाजिक धार्मिक आणि आर्थिक क्षेत्रात भरीव असे कार्य केले. अशा थोर कार्यकर्त्याचे 72 व्या वाढदिवसानिमित्त सत्कारपूर्वक अभिनंदन करण्यासाठीं व त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता दर्शविण्यासाठी बोले सत्कार समिती स्थापन करण्यात आली. त्या सत्कार समितीचे स्वागताध्यक्ष जमनादास मेहता होते. प्रमुख कार्यवाह सनजी शाह होते. स्वागत समितीचे सभासद डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, ना. दा. सावरकर, डॉ. पी. सोळंकी, दानशूर भक्तीभूषण भागोजी बाळोजी कीर आदी प्रतिष्ठीत नागरीक होते. सुमारे 50 संस्थांनी यात सहभाग घेतला होता. अल्पनिधी अर्पण करण्याचे सर्वानुमते ठरले होते. त्या निधीला गुणवंत व उदार हृदयाचे श्रीमंत महाराज तुकोजीराव होळकर यांनी 1 हजार रुपयांची उत्स्फूर्त देणगी दिले होती. सत्कार समारंभ कित्ते भंडारी सभागृह येथे 15 डिसेंबर 1940 रोजी साहित्य सम्राट न. चि. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. सत्कार समारंभाला मुंबई येथील नामांकित सर्व पक्षाचे नेते उपस्थित होते. डॉ. ना. दा. सावरकर यांनी मानपत्र वाचले. त्यानंतर अध्यक्षांच्या हस्ते बाबासाहेब बोले यांना रुपये 2001 ची थैली व मानपत्र अर्पण करण्यात आले. त्या मानपत्रात म्हटले होते की दुय्यम शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे लागून पैसा आणि स्वसुखोपयोग मोठा त्याचा हव्यास न करता विद्येत मागासलेल्या बहुजनांच्या सर्वांगिण विकासासाठी राहणे हे आपल्या आयुष्याचे धोरण आपण तरुणपणीच ठरविले आणि त्या प्रित्यर्थ तन मन धन अर्पण करुन स्वत:स वाहून घेतले. फाळणीला त्यांचा विरोध होता. त्यांच्या धडपडीमुळे त्यांना अटक होण्याची शक्यता होती. परंतु गृहमंत्री मोरोरजी देसाई यांनी वॉरंट वर सही करण्याचे नाकारले. त्यांचा पाकिस्तानला असलेला विरोध त्यांच्या तर्कशुद्ध विचारसरणीची आणखी एकदा प्रचिती आणून देतो.कोकण रेल्वेची मागणी प्रथम बाबासाहेबांनी केली. अतिशय चिंचोळ्या असलेल्या डोंगर राजीतून अशा प्रकारचा रेल्वेमार्ग नेणे शक्य नाही असे अनेक अभियंते सांगत. स्वतंत्र महामंडळ स्थापून आणि पाण्यासारखा पैसा खर्च करुन निसर्गावर मात करुन कोकण रेल्वेचा 760 कि. मी. चा मार्ग मोकळा झाला. बाबासाहेबांनी 75 वर्षे म्हणजे 1926 साली कोकण रेल्वेची मागणी केली होती. रेल्वेची किती आवश्यकता आहे म्हणून बोलेसाहेबांनी नवयुगमध्ये एक लेख लिहिला होता. ब्युकले नावाच्या इंग्रजी अभियंत्याने ही योजना तयार केली.
13 मार्च 1926 रोजी बाबासाहेबांनी विधीमंडळात कोकण रेल्वेच्या मागणीचा विषय मांडला होता. एकदा विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्ष वेधले होते. गंगाधर अनंतराव मिरकर यांनी ही रेल्वे कशा प्रकारे नेता येईल यासाठी एक योजना तयार केली होती. या योजनेलाही बाबासाहेबांनी पाठिंबा दिला. बाबासाहेबांनी मांडेलेली विधेयकेव पाठिंबा दिलेली विधेयके पाहिली तर त्यांची दृरदृष्टी लगेचच लक्षात येते. लोकसंख्या नियंत्रणाचा विचारही त्या काळात मांडण्याचे धाडस केले होते. कोकण रेल्वेची मागणी हा तर त्यांच्या दूरदृष्टीचा मोठा पुरावा होता. 75 वर्षापूर्वी कोकणच्या जनतेला कोणी वाली नसताना कोकण रेल्वेची मागणी करणे हे मोठे धाडसाचे काम होते. त्याची दखल कोकण रेल्वे महामंडळाने कोठेही घेतलेली आढळत नाही. परंतु इतिहासतज्ञ मात्र बाबासाहेबांचे योगदान आवर्जुन नमूद करतात.
बाबासाहेबांवर मान्यवरांनी उधळलेली गौरवपुष्पे
1) आपली सारी हयात दलितांच्या, गरीबांच्या कामासाठी घालविली. प्रख्यात साहित्यिक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
2) सामाजिक कार्यकर्ते होते. प्रत्येक कार्यात त्यांची तळमळ दिसून येत होती. तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी.
3) विसाव्या शतकातील समाजसुधाकरांच्या मालिकेतील सी. के. बोले यांचे स्थान फार वरचे आहे. माजी मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण
४) तरुण वयापासून स्वत:ला अक्षरश: तनमनधन वेचून जुंपून घेतले. प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे अतिशय साधे, सरळ, निष्कपटी सामाजिक कार्यकर्ते बाळाराव सावरकर
5) मागासवर्गासंबंधी आस्था होती. मग तो आर्थिक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय असो त्यांच्यासाठी त्यांची धडपड असे. पत्रकार आप्पा पेंडसे,
6) अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता व ते खरेखुरे कार्यकर्ते होते. साहित्यिक शं. ना. नवरे
7) विशिष्ट ज्ञाती समाजपुरते काम न करता व्यापक प्रमाणात त्यांनी काम केले. प्राचार्य अ. ना. चिखलीकर
8) संघटनात्मक चळवळ आणि कायदे कानून मार्गाने त्यांंनी प्रयत्न केले. भा. र. कद्रेकर संपादक प्रबुध्द भारत
9) साक्षरता प्रसार शिक्षणाची सोय अस्पृश्यता निवारण, कामगारांचे कामाचे तास निश्चित करणे, अशी अनेक कामे केलेली आहेत. व्ही. बी. वरळीकर, माजी महापौर मुंबई
10) त्याच्या कामाची तुलना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कामाशी करावी लागेल. डॉ. त्रि. रा. नरवणे
11) बाबासाहेब बोले हे जन्मत:च सामाजिक कार्यकर्ते होते. अनेक कामे केली त्यांचे दृष्टेपण त्याच दिसून येते.
माजी केंद्रीयमंत्री सी. डी. देशमुख.बाबासाहेबांनी 92 व्या वर्षात पदार्पण केले होते. तरी मनावर व विचारांवर त्यांचे नियंत्रण चालत होते. घराच्या मंडळींंना त्यांचा दरारा वाटे. बोले यांचे शरीर विकल होत चालले होते. दृष्टी अधू झाली होती. कानही काम देत नव्हते. पावले अडखळू लागली. पायमार्गावरुन काठी टेकीत ती 5 फूट 5 इंच मूर्ती जायची. पोशाखात थोडा बदल केला होता. किरमजी रंगाचा लांब कोट, धोतर, काळी पोटी, डोळ्यावर सोनेरी चष्मा व पायात चप्पल घालून काटी टेकीत पायमार्गाने जात होते. त्यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळींच्यावतीने मुंबईचे महापौर भाई शांताराम मिजरकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सत्कार 29 जून 1928 रोजी कित्ते भंडारी सभागृहात साजरा करण्यात आला. बाबासाहेब म्हणाले, मी भंडारी समाजात जन्माला आलो असलो तरी आयुष्यभर मी स्वत:ला अखिल मराठी समाजाचा सेवक समजून अस्पष्यतेच्या निवारणासाठी झटलो.
31 डिसेंबर 1960 नेहमीचा न्हावी दाढी करायला आला नाही. हळूच मागल्या दाराने दाढी करावयास जात असताना त्यांना ट्रकचा अपघाती धक्का लागला. रुग्णालयात नेण्यात आले. शस्त्रक्रिया झाली. बरे वाटू लागले. पुढे पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली आणि शनिवार दि. 14 जानेवारी 1961 ला मकर संक्रांतीच्या दिवशी ज्या दिवशी 70 वर्षापूर्वी त्यांनी कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी स्थापली तो दिवस आला. त्याच दिवशी रुग्णालयातच सायंकाळी त्यांनी आपला देह ठेवला. दुसर्या दिवशी त्यांची प्रेतयात्रा सकाळी 10.30 वाजता निघाली.
त्या प्रेतयात्रेत मुंबईतील सर्व पक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्ते सामील झाले होते. मुंबईतील साहित्यिक मंडळीही उपस्थित होती. भंडारी समाजाच्या सर्व संस्थांचे कार्यकर्ते, दादर येथील अनेक संस्था, भरारी, मार्मिक, नवयुग, मराठा, सांजमराठा आदी वृत्तपत्रे व सुमारे 200 संस्था यांच्यावतीने त्यांच्या देहाला पुष्पहार अर्पण करण्यात आले. लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती. प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, प्रो. व्ही. जी. राव, शं. ना. नवरे, डॉ. वसंत रणदिवे आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या 70 वर्षात चंदनाप्रमाणे देह झिजवून 93 वर्षांची तपश्चर्या त्यांनी समाप्त केली.
अशा लोकहितकर्ते बाबासाहेब बोले यांची 156 वी जयंती दि. 29/6/2025 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत कित्ते भंडारी हॉल सी. के. बोले सभागृह, बंदररोड, रत्नागिरी त्याचप्रमाणे दि. 28/6/2025 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत बहुजनांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन बहुजन समाजाने एकत्रित येवून आयोजित केलेले आहे. तरी बहुजनांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा म्हणून आयोजकांनी विनंती केली आहे.
जय बहुजन॥ श्री. सुरेंद्र यशवंत घुडे
समाजभूषण, घुडेवठार, रत्नागिरी.
मोबा. : 9404994498