
आषाढी एकादशी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात दाखल होणार्या राज्यातील एक हजार 109 दिंड्यांना राज्य सरकारने प्रत्येकी 20 हजार रुपयांचे अनुदान जाहीर.
आषाढी एकादशी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात दाखल होणार्या राज्यातील एक हजार 109 दिंड्यांना राज्य सरकारने प्रत्येकी 20 हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. दरम्यान, वारीसाठी पंढरपूरला जाणार्या पालख्या, भाविकांच्या व वारकर्यांच्या सोयी-सुविधांसाठी असलेल्या वाहनांबरोबरच एसटीलाही विविध मार्गांवर टोलमाफी देण्यात आली आहे.तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील मानाच्या 10 पालख्यांसोबत येणार्या प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले होते.
या पार्श्वभूमीवर यंदा 6 जुलैच्या आषाढी एकदशीसाठी दिंड्यांना 20 हजार रुपये अनुदान देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले होते. त्यानुसार 2 कोटी 21 लाख 80 हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. दिंड्यांना निधीचे वितरण करण्याची जबाबदारी पुणे विभागीय आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.
वारीसाठी पंढरपूरला जाणार्या पालख्या, भाविक व वारकर्यांच्या हलक्या व जड वाहनांना टोलमाफी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने परिपत्रक जारी केले आहे. टोल माफीसाठी जवळच्या वाहतूक पोलिस चौकी, आरटीओ कार्यालयातून स्टीकर्स उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ही सवलत परतीच्या प्रवासालाही लागू राहणार असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. त्याचबरोबर पंढरपूरला जाणार्या प्रमुख महामार्गावरील खड्डे भरण्याचे तसेच रस्त्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.