
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी ३० जून पर्यत धान्य रेशन दुकानातून घेवून जावे.
रत्नागिरी, दि.३० :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी माहे ३० जून २०२५ पर्यत माहे जून ते ऑगस्ट २०२५ पर्यंतचे तीन महिन्याच्या आपल्या हक्काच्या अन्नधान्याची उचल रास्त धान्य दुकानांमधून त्वरित करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी केले आहे.*राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माहे ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्याना ३० जून २०२५ पर्यत रास्त भाव दुकानांमधून वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या धान्याची उचल ३१ मे पर्यत करण्याचे आदेश देण्यात आले असून जिल्हयात आतापर्यत ३१ टक्के धान्य गोदामापर्यत उचलण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी जूनमध्ये आपल्या हक्काचे तीन महिन्यांचे एकत्रित धान्य रास्त धान्य दुकानातून घेवून जावे. 9 मे 2025 च्या शासन निर्णयानुसार पावसाळ्यामुळे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्याना माहे जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ अशा तीन महिन्यांचे एकत्रित धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या निर्देशानुसार सर्व तहसिलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षक, गोदाम व्यवस्थापक, गोदाम पालक, रास्त धान्य दुकानदार यांच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, मे. क्रिएटीव्ह ग्रेन्स ट्रान्सपोर्ट कंपनीचे प्रतिनिधी, हमाल कामगार संघटनेचे प्रतिनिधी, हमाल ठेकेदार संस्थेचे प्रतिनिधी, हमाल मुकादम या सर्वासोबत १२ मे रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रजपूत यांनी बैठक घेवून सर्वाना शिस्तबध्दरित्या काम करून मुदतीत उचल पुर्ण करावी. जेणेकरून एकही लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये अशा सुचना दिल्या.
बैठकीत रास्त धान्य दुकान संघटनेचे अशोक कदम यांनी रास्त धान्य दुकानदारांच्या अडचणी मांडल्या व त्याबाबत चर्चा केली. भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून धान्याची उचल सुरु करण्यात आली आहे. सदर धान्य जिल्हयातील ९५२ रास्त धान्य दुकानापर्यत पोच करण्यात येत आहे. ही मुदत ३१ मे पर्यत आहे. जिल्हयात मागील काही दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहतुकीचा वेग काहीसा मंदावला असला तरी उचल मुदतीत पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. काही कारणास्तव उचल थोडी पुढे जाऊ शकते. सरकारच्या सूचनेनुसार ३० जूनपर्यत तिन्ही महिन्यांचे धान्य वाटप करण्यात येईल.