
अनुसूचित जाती विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीविषयक अर्ज महाविद्यालयांनी ऑनलाईन वर्ग लाभ द्यावा.
रत्नागिरी, दि. 21 : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती सन 2025-26 मध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणीकृत करणे हा प्रवेश प्रक्रीयेचा भाग म्हणून महाविद्यालयांनी राबवावा. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी अनुसूचित जाती विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीविषयक योजनांचे पात्र विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या लॉगिनला ऑनलाईन वर्ग करून जास्तीत जास्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत व सन 2025-26 मध्ये जिल्ह्यातील कोणताही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची काटेकोर दक्षता महाविद्यालयांनी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण दीपक घाटे यांनी केले आहे.
सन २०१८-१९ पासून “महाडीबीटी पोर्टल” व्दारे ऑनलाईनरीत्या राबविण्यात येत असलेल्या अनुसूचित जातीप्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रीशिप व विद्यावेतन इत्यादी योजनांतर्गत चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज स्वीकृती दि.15 जून 2025 पासून सुरू करण्यात येणार आहे. चालू शैक्षणिक वर्षांत या योजनांची प्रभावी अमंलबजावणी होण्याच्या दृष्टीने अनुसूचित जाती विद्याथ्यांचे ऑनलाईन (नवीन व नुतनीकरणाचे) अर्ज महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे पाठविण्याकरता दि. १५ जून पासून कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रमांसाठी दि. 15 ऑगस्ट 2025 पर्यंत, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दि.10 सप्टेंबर 2025 पर्यंत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दि. 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत निर्धारीत केलेली आहे.
केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य हिश्याच्या वितरणानंतरच केंद्र हिश्याचे वितरण होणार असल्याने राज्य हिश्याचे वितरण लवकरात लवकर होणेच्या दृष्टीने महाविद्यालयांनी अर्ज छाननी करून परिपूर्ण अर्ज मंजुरीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे ऑनलाईन पाठवणे आवश्यक आहे. तसेच, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णयानुसार शिष्यवृत्तीकरिता महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे ही बाब विद्याथ्यांच्या प्रवेश प्रक्रियेचाच भाग असून महाविद्यालयांनी विद्यार्थ्याचा प्रवेश प्रक्रिया चालू असतानाच विद्यार्थ्याचा ऑनलाईन अर्ज भरून घेणे महाविद्यालयांवर बंधनकारक आहे. त्यादृष्टीने सर्व महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती योजनांचे माहितीपर फलेक्स/होडिंग त्यांचे परिसरात लावून, समाज माध्यमांद्वारे योजनेची व्यापक माहिती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, महाविद्यालयातील “समान संधी केंद्राव्दारे” देखील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यास योग्य ती मदत करावी.000