
लोटे औद्योगिक वसाहतीतील ॲक्विला ऑरगॅनिक कंपनीत रिॲक्टरचा स्फाेट, गंभीर जखमी झालेल्या एका कामगाराचा मृत्यू.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत रविवारी स्फोटांनी हादरली. लासा सुपरजिनेरिक कंपनीत लागलेल्या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. तर, काही तासांच्या अंतराने ॲक्विला ऑरगॅनिक कंपनीत रिॲक्टरचा स्फाेट झाला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या एका कामगाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर, अन्य एका कामगाराला ऐराेली येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.
दिलीप दत्तात्रय निचिते (४७, सध्या रा. खेड, मूळ रा. वालशेत, ता. शहापूर, ठाणे) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर अनंत शांताराम खरपडे (४८, सध्या रा. खेड, मूळ रा. आबिटघर, ता. वाडा, पालघर) असे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे.रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला लासा सुपर जिनेरिक कंपनीत अचानक भीषण आग लागली. आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट असले तरी, संपूर्ण कंपनी अवघ्या दोन तासांत जळून खाक झाली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.