
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा चोरट्याने मोबाईल लांबून त्या आधारे बँकेतून पैसेही काढले.
संगमेश्वर रेल्वे स्टेशनवर प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाचा १०,००० रुपये किंमतीचा विवो कंपनीचा निळसर काळपट रंगाचा वाय ३६ मॉडेलचा मोबाईल हॅन्डसेट अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना २२ एप्रिल २०२५ ते ०२ मे २०२५ या कालावधीत घडली.याबाबत संतोष सुभाष राणे (वय ४२, रा. सहुरे, गावठाणवाडी, ता. वैभववाडी, जि. सिधुदूर्ग) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राणे हे २२ एप्रिल रोजी दिवा-सावंतवाडी पॅसेंजरने प्रवास करत असताना संगमेश्वर रेल्वे स्टेशन येथे त्यांच्याजवळून मोबाईल चोरीला गेला.तक्रारदारांनी बँकेत जाऊन त्यांच्या खात्याची तपासणी केली असता, चोरी झालेल्या मोबाईलचा वापर करून त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा वैभववाडी येथील खात्यातून २२ एप्रिल ते ०२ मे २०२५ दरम्यान एकूण १६,९०० रुपये काढण्यात आल्याचे उघडकीस आले.