
“मी उपलब्ध नाही”, पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळाबरोबर जायला युसूफ पठाण यांचा नकार!
पाकिस्तानातील दहशतवादाविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सात खासदारांचा समावेश असून हे खासदार अनेक प्रमुख देशांच्या राजधान्यांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडतील. या खासदारांच्या शिष्टमंडळात पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार व माजी भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचं देखील नाव होतं. मात्र, ते या शिष्टमंडळाबरोबर जाणार नाहीत.
युसूफ पठाण यांनी स्वतःच केंद्र सरकारला सांगितलं आहे की ज्या काळात हे शिष्टमंडळ दौरे करणार आहे त्या काळात मी उपलब्ध नाही. केंद्र सरकारने युसूफ पठाण यांच्याशी थेट संपर्क साधला होता. मात्र युसूफ यांनी ते उपलब्ध नसल्याचं कारण सांगितलं आहे. तृणमूल काँग्रेसने युसूफ यांना असं कारण देण्यास सांगितलं असावं असा सूर भाजपा नेत्यांमधून उमटू लागला आहे.
परराष्ट्र धोरण ही केंद्र सरकारची जबाबदारी : तृणमूल काँग्रेस
केंद्र सरकारने तृणमूल काँग्रेसशी संपर्क न करता थेट युसूफ पठाण यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, पठाण यांनी केंद्राला नकार कळवला आहे. दुसऱ्या बाजूला, तृणमूल काँग्रेसने परराष्ट्र धोरणावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. परराष्ट्र धोरण हा भारत सरकारचा विषय आहे. यांची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारनेच घेतली पाहिजे, असं म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या शिष्टमंडळापासून अंतर राखलं आहे.
तृणमूलचे अभिषेक बॅनर्जी म्हणाले, “राष्ट्रहितासाठी, दहशतवादाविरोधात लढण्यासाठी केंद्र सरकार जे निर्णय घेईल त्या निर्णयांचं आम्ही समर्थन करून. सरकार जी पावलं उचलेल त्यात आम्ही सरकारच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. सरकारने शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलाय त्या निर्णयावर अथवा सदस्य निवडीवर आमचा आक्षेप नाही. मात्र, आमच्या पक्षातून कोणाला पाठवायचं असेल तर तो निर्णय आमचा पक्ष घेईल. इतर पक्षांच्या लोकांनी असे निर्णय घेऊ नयेत. कुठल्या पक्षाचा कोणता नेता या शिष्टमंडळाबरोबर परदेशात जाणार याचा निर्णय केंद्र सरकारने, भारतीय जनता पार्टीने घेऊ नये”