
नापासांसाठी शाळा काढण्याची गरज, ऍड. विलास पाटणे
* उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मार्च २०२५ च्या दहावीच्या परीक्षेत २०१२ सालीं स्थापन झालेल्या कोकण बोर्डाचा ९८.८२ लागला. राज्यातील नऊ विभागात सतत चौदाव्यांदा प्रथम क्रमांकासह सातत्याने शिखरावर राहणे कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. तज्ञांचे मार्गदर्शन, योग्य सराव, नियोजन व परस्पर संवाद यामुळे कोकण पॅटर्नने महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर आपले नाव अधोरेखित केले आहे.दहावी आणि बारावी परीक्षेत महाराष्ट्रात यावर्षी नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. विद्यार्थ्यांना नापास करून त्याच वर्गात ठेवल्याने शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होते असे कोणतेही संशोधन सिद्ध करीत नाही. उलट कपाळावर नापासाचा शिक्का बसल्याने विद्यार्थी प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात. आइन्स्टाईन, कुसुमाग्रज, अभिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर ही मोठी माणसं आयुष्यात कधी ना कधी परीक्षेत नापास झालीच होती. मार्कलिस्ट म्हणजे आयुष्याचा ताळेबंद नव्हे आणि दहावीची परीक्षा ही अंतिम परीक्षा नसते. हे लक्षात घेण्याची गरज आहे. यशाचा एक दरवाजा बंद झाला तरी तुम्हाला अनेक दरवाजे खुणावत आहेत. नापास विद्यार्थ्यांना सन्मानाने जगण्यासाठी समाजाने त्यांच्या कौशल्य क्षमतांचा विकास केला पाहिजे. तसेच नापासांसाठी वेगळी शाळा काढण्याचा प्रयोग राबविण्याची गरज आहे. त्यांमा मानसिकदृष्ट्या बाहेर काढण्याची आवश्यकता आहे तसेच याचा समाजशास्त्रीय अभ्यास करण्याचे आव्हान आपण पेलले पाहिजे.www.konkantoday.com