
१० ते १२ मे जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह कृषी विकास परिषद व पशु-पक्षी प्रदर्शन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
रत्नागिरी, दि. 9 ) : जिल्हा नियोजन समिती, प्रकल्प संचालक, आत्मा, कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यांच्यावतीने 10 ते 12 मे रोजी स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल, आठवडा बाजार येथे सकाळी 10 ते रात्रौ 10 या वेळेत जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषद व पशु-पक्षी प्रदर्शन 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते 10 मे रोजी होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी तसेच प्रक्रिया धारक, पशुपालक यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले व प्रकल्प संचालक आत्मा विजय बेतीवार यांनी केले आहे.
या कार्यक्रमामध्ये आंबा व शेतमाल उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीचे स्वतंत्र दालन, बचत गटांचे उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री, विविध जातींचे पशू-पक्षी प्रदर्शन, कृषी व कृषी संलग्न विभागांची स्वतंत्र दालने, अत्याधुनिक कृषी यंत्रे अवजारे यांची स्वतंत्र दालने, कृषी निविष्ठा यांची स्वतंत्र दालने, खवय्यांसाठी रूचकर अस्सल कोकणी पदार्थांची मेजवानी अशी एकूण १६५ विविध गट, कृषी व कृषी संलग्न विभागांची प्रशस्त दालने असणार आहेत. या दालनांमध्ये प्राधान्याने जिल्ह्यातील शेतकरी व बचतगट यांना मोफत दालने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
11 मे रोजी सायंकाळी 6 वाजता कृषी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे याबरोबरच जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान, कृषी विषयक विविध परिसंवाद इ. कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आलेले आहे. तसेच 10 मे रोजी पौष्टीक तृणधान्ये व पारंपरिक अशा दोन्ही प्रकारात पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 10 मे रोजी सांयकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मराठमोळा महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी हास्यजत्रा फेम कलाकार गौरव मोरे पॅडी कांबळे, गायक अभिजित कोसंबी, ईशानी पाटणकर, निशांत शेख उपस्थित राहणार आहेत. 11 मे रोजी सायंकाळी 7 वाजता जल्लोष कार्यक्रमामध्ये गायक रोहित राऊत, जुईली जोगळेकर, वादक आमिर हडकर उपस्थित राहणार आहेत.