
देशातील तब्बल 244 शहरांमध्ये बुधवारी एकाचवेळी तर महाराष्ट्रातील 16 ठिकाणी होणार युद्धाची मॉक ड्रील
भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील राज्यांना अलर्ट केले आहे. देशातील तब्बल 244 शहरांमध्ये बुधवारी एकाचवेळी सुरक्षेच्या तयारीबाबतचे मॉक ड्रील घेतले जाणार आहे.या यादीत मुंबई, पुण्यासह उरण, तारापूर अशा महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारताकडून पाकिस्तानवर हल्ला केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारताकडून त्यादृष्टीने पावले टाकली जात आहेत. दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढल्यास किंवा युध्दाची स्थिती निर्माण झाल्यास काय दक्षता घ्यावी, यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने सुरक्षेच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठिकाणी मॉक़ ड्रीलचे आदेश दिले आहेत.देशात 7 मे म्हणजे बुधवारी नागरी संरक्षण जिल्हे, ठिकाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 244 ठिकाणी नागरी संरक्षण सराव आणि तालीम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश आहेत. या ठिकाणांची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे.
सर्वात पहिल्या म्हणजेच सर्वाधिक संवेदनशील गटात पहिल्या स्थानावर मुंबई त्यानंतर उरण व तारापूर या ठिकाणांचा समावेश आहे.दुसऱ्या गटामध्ये ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ वैशेत, पिंपरी चिंचवड या ठिकाणांचा समावेश आहे. तर छत्रपती संभाजीनगर, भूसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणांचा तिसऱ्या गटात समावेश आहे. या तिन्हा गटांतील ठिकाणी मॉक ड्रील होणार आहे. त्यामुळे येथील प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.
मॉक ड्रीलदरम्यान, हवाई हल्ल्यावेळी वाजतात तसे सायरन वाजवले जातील, अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित करून ब्लॅकआऊट केले जाईल. जवळच्या आश्रयस्थळी जाण्याचा, आणीबाणीच्या स्थितीमध्ये जलद प्रतिसाद देण्याचा सराव घेतला जाईल.स्थानिक प्रशासन, पोलीस, होमगार्ड्स, राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस) आणि शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सामान्य नागरिकांना युद्धस्थितीमध्ये काय करावे, केव्हा करावे आणि संयम कसा राखावा हे लक्षात आल्यास संपूर्ण राष्ट्राची ताकद वाढते, हे यातून समजावून सांगितले जाणार आहे.