
पूर्वा किनरे, आकांक्षा कदमला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान
रत्नागिरी : राज्य शासनाचा मानाचा समजला जाणारा शिवछत्रती पुरस्कार रत्नागिरीच्या आकांक्षा कदम व पूर्वा किनरे यांना जाहीर करण्यात आला होता. शुक्रवारी मुंबईत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सन २०२२-२३ साठी योगापटू पूर्वा शिवराम किनरे हिला तर २०२३-२४ साठी कॅरमपटू आकांक्षा उदय कदम हिला वयाच्या १९ व्या वर्षीच राज्य शासनाकडून शिवछत्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. शुक्रवारी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
दोन्ही खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.राज्यातील पहिल्या शासकीय योगा केंद्राची खेळाडू पूर्वा किनरे हिला महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा, राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. योगासन या क्रीडा प्रकारासाठी मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पालीजवळच्या कशेळी या खेडेगावात राहणाऱ्या पूर्वाने योगासन प्रकारात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला. रत्नागिरी येथील क्रीडा कार्यालयात असलेल्या राज्यातील पहिल्या योग क्रीडा केंद्रामध्ये राज्यातील पहिले योग क्रीडा मार्गदर्शक रवीभूषण कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ती १२ वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहे. अविरत मेहनत व प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर तिने योगासनामध्ये यशाची मोठी उंची गाठली. तिची योगासनातील तपश्चर्या शिवछत्रपती पुरस्काराच्या माध्यमातून फळाला आली आहे.पूर्वाची योगासनातील सर्वोत्तम कामगिरी पाहून लहान बहीण प्राप्ती हिलाही प्रेरणा मिळाली. प्राथमिक शिक्षक असलेल्या आणि खो-खोचे पंच असलेल्या वडिलांनी या दोन्ही मुलींना मोठे पाठबळ दिले. त्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवता आला. पनवेल येथील महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेत असलेल्या पूर्वा हिने अभ्यासाबरोबरच योगासनातील आपली साधना कायम ठेवली.
शिवछत्रपती पुरस्कारासाठी योगाचाही समावेशराष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून योगासन या पारंपरिक खेळ प्रकाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. त्यामुळे निश्चितपणे युवा खेळाडूंना या खेळ प्रकारासाठी प्रेरणा मिळेल. योगासनातील आमची १२ वर्षाची मेहनत पदकाच्या माध्यमातून आता यशस्वी ठरली आहे. युवा योगपटूंसाठी आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ ठरत आहे.