
पीओपी गणेशमूर्तींवरील बंदीमुळे पेणचा गणेशमूर्ती व्यवसाय अडचणीत येण्याची भीती अनेकांचा रोजगार कमी होणार
पेणमध्ये पुढच्या वर्षीसाठी गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते. शाडूची माती आणि पीओपी अशा दोन माध्यमांतून ३५० हून अधिक प्रकारच्या मूर्ती इथे तयार केल्या जातात. त्यात पीओपीच्या गणेशमूर्तींचे प्रमाण अधिक असते. यावर्षी जवळपास १० लाख गणेशमूर्ती तयार झाल्या आहेत. पण आता पीओपी गणेशमूर्तींवर बंदी घालण्यात आल्याने, या तयार गणेशमूर्तींचे करायचे काय हा प्रश्न मूर्तिकारांना पडला आहे. त्यांनी गणेशमूर्ती व्यवसायासाठी बँकांकडून कर्जे घेतली आहेत. गणेशमूर्तींची विक्री झाली नाही, तर कर्जाची परतफेड करणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे हा व्यवसाय आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यावसायिकांना वाटत आहे.केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार २०१० साली पर्यावरणपूरक सण, उत्सव साजरे करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. २०२० साली त्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या गेल्या. यानुसार नैसर्गिक जलस्राोतांमध्ये पर्यावरणपूरक नसलेल्या मूर्तींच्या विसर्जनावर निर्बंध लागू केले गेले. त्यांचे पालन न झाल्यामुळे पर्यावरणवादी संस्था न्यायालयात गेल्या.
आता स्थानिक स्वराज्य संस्थांना संबंधित नियमावलीचे काटेकोर पालन करावेच लागेल, आणि तिची अंमलबजावणी व्हायलाच हवी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाकडून पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदीबाबत पावले उचलली गेली आहेत.पेण शहर आणि परिसरात गणेशमूर्ती बनवणाऱ्या ५५० हून अधिक कार्यशाळा आहेत. इथे दरवर्षी सुमारे ३५ लाख गणेशमूर्ती तयार केल्या जातात. यातून जवळपास ८० कोटी रुपयांची उलाढाल होते आणि २३ ते २४ हजार लोकांना वर्षभर रोजगार उपलब्ध होतो.