
राज्यातील रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांपैकी किमान ८० टक्के ईव्ही वाहने होतील यादृष्टीने प्रयत्न सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
एस टी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने अपारंपरीक इंधनावर परावर्तीत करण्यात येणार आहेत. एसटीच्या बसेस इलेक्ट्रिक आणि एलएनजी इंधनावर सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, एसटी महामंडळाकरिता ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसेसची खरेदी करण्यात येणार आहे. यापैकी ४५० बसेस खरेदी केल्या आहेत. तसेच एसटीच्या सध्याच्या बसेस एलएनजीमध्ये परावर्तीत करण्यात येणार आहे. एलएनजी पुरवठा करण्यासाठी करार करण्यात आला आहे. राज्यात ईव्हीच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईव्ही धोरण आणले आहे.ईव्ही वाहनांवर ६ टक्के कर मागेराज्यात मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ३० लाखापेक्षा जास्त किमतीच्या ईव्ही वाहनांवर ६ टक्के कर आकारण्याचे जाहीर केले आहे. परंतु हा कर मागे घेण्याची घोषणा सभागृहात करण्यात येणार आहे. राज्यातील रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांपैकी किमान ८० टक्के ईव्ही वाहने होतील यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. ईव्ही वाहनांचा वापर वाढला की प्रदूषण कमी होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल. जास्तीत जास्त ईव्ही बसेस घेण्याचा प्रयत्न असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही प्रदूषण मुक्त असावी असे शासनाचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय वाहनेही इलेक्ट्रीक करण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आमदारांनाही देण्यात येणाऱ्या वाहन कर्जावरील व्याज सवलतीही ईव्हीसाठीच देण्यात येतील. सर्व मंत्री यांची वाहनेही ईव्हीमध्ये बदलण्याचे शासनाचे नियोजन आहे.