
मोबाईल आणि टिव्ही प्रमाणे आठवणीने विहीर आणि विंधन विहीर रिचार्ज करा… प्रशांत परांजपे यांचे जलदिनानिमित्त आवाहन
दापोली २२ :- २२ मार्च हा जागतिक जल दिन संपूर्ण देशभर साजरा केला जातो.जालगांव ग्रामपंचायत येथे माझी वसुंधरा ५.० अंतर्गत जागतिक जलदिनानिमित्त जलपूजनाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी योगगुरू विश्वास फाटक,योगशिक्षक नंदा साळुंखे,योगशिक्षक कविता मोरे ,ग्रामपंचायत सदस्य शोभाताई दांडेकर आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. पृथ्वीवरील एकूण पाण्याच्या फक्त 2.5% पाणी पिण्यायोग्य आहे.अर्थात गोडं आहे.बाकी सर्व पाणी हे खारे पाणी आहे.त्यामुळेच पाण्याचे संवर्धन अतिमहत्वाचे आहे. आपण मोबाईल व टिव्ही नेमाने रिचार्ज करतो पण विहीर आणि बोअरवेल रिचार्ज कधी करणार…ती वेळ आता सुरू झाल्ये.सर्वांनी विहीर आणि विंधन विहीरीचे रिचार्ज मारणे अर्थात पुनर्भरण करणे अत्यावश्यक आहे.पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याच्या कामाला आजच्या जागतिक जलदिनानिमित्त सुरूवात करायला हवी असे आवाहन जलप्रेमी प्रशांत परांजपे यांनी जागतिक जलदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून केले.