
स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तूचा भूमिपूजन समारंभ दि.२३ मार्च २०२५ रोजी ना.डॉ.उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते
स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तू निर्माण कार्याचा शुभारंभ रविवार दि.२३ मार्च २०२५ रोजी ना.डॉ.उदयजी सामंत, उद्योगमंत्री महाराष्ट्र तथा पालकमंत्री रत्नागिरी यांच्या शुभहस्ते आणि विभाग संघचालक श्री.दत्ताजी सोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आठवडा बाजार नजीक गांधी कॉलनी समोरच्या प्लॉटमध्ये आयोजित करण्यात आला आहे. ३४ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेच्या आजपर्यंत ८ ठिकाणी स्वमालकीची कार्यालये आहेत. मात्र प्रधान कार्यालयाची ही इमारत स्वमालकीच्या जागेत उभी राहणार आहे.
संस्थेच्या ४८ हजार सभासदांचे दृष्टीने नव्याने उभे राहणारे हे स्वरूप अर्थ मंदिर हा औचित्याचा विषय ठरला आहे. सुसज्ज स्वरूपात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची ही नूतन वास्तू २ वर्षात उभी राहावी असा प्रयत्न राहणार आहे. रविवार, दि.२३ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. रत्नागिरी शहराच्या अत्यंत मध्यवर्ती भागात होणारे हे संस्थेचे कार्यालय स्वरूपानंद पतसंस्थेच्या आर्थिक भव्यतेला साजेसे असणार आहे.
सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक सर्वांच्या सदिच्छाच्या बळावर उभी राहणारी ही नूतन वास्तू स्वरूपानंदच्या आजवरच्या प्रतिष्ठेला साजेशी असेल असे संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले. भूमिपूजनाच्या या मंगल कार्यक्रमाला संस्थेचे सभासद, हितचिंतक यांनी आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे विनम्र आवाहन अॅड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.