
प्रवासात एसटी बंद पडल्यास त्या मार्गावर साधी बसच नव्हे तर आता उच्च श्रेणीच्या बसनेही प्रवाशांना प्रवास करता येणार
प्रवासात एसटी बंद पडल्यास त्या मार्गावर साधी बसच नव्हे तर आता उच्च श्रेणीच्या बसनेही प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्यासाठी जादा तिकीट दरही द्यावा लागणार नाही. प्रवास नाकारल्यास किंवा त्याबाबत तक्रार आल्यास संबंधित चालक आणि वाहकावर कारवाई होणार असल्याच्या सूचना राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून देण्यात आले आहे.प्रवासात काहीवेळा तांत्रिक बिघाडामुळे एसटी बस रस्त्यात बंद पडत असल्याच्या घटना घडतात. किंवा किरकोळ अपघाताच्या घटनाही घडतात, अशावेळी बसमधील प्रवाशांना पुढे जाण्यासाठी उशीर होतो, मन:स्ताप सहन करावा लागतो.
प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी एसटीकडून त्या मार्गावरून येणाऱ्या दुसऱ्या एसटी बसने प्रवाशांना सुविधा दिली जाते. मात्र, साधी बस (लालपरी, विना वातानुकुलीत) बंद पडल्यास उच्च श्रेणीच्या बस (वातानुकुलीत आणि आरामदायी) थांबत नसे. थांबल्याच तर प्रवाशांकडून तिकीटाचा फरक वसूल केला जात होता.मात्र, आता एसटीकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार प्रवासात साधी बस बंद पडल्यावर त्याच मार्गावरून येणाऱ्या बसमधून प्रवाशांना तत्काळ सुविधा देणे बंधनकारक आहे. त्यामध्ये उच्चश्रेणीच्या बसचाही समावेश करण्यात आला असून, त्यासाठी तिकीटाचा फरक घ्यायचा नाही. आहे त्याच तिकिटावर प्रवास सुविधा द्यायची, असे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि मनस्ताप वाचणार असून, सुविधा तात्काळ उपलब्ध होणार आहे.