
रत्नागिरी शहरातील पतीतपावन मंदिराची पुनर्उभारणी व परिसराचे सुशोभीकरण करण्याचा मनोदय-आमदार किरण सामंत
रत्नागिरी :
ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली प्राथमिक भूमिका असून स्वातंत्र्यविर वि. दा. सावरकर आणि दानशूर भागोजीशेठ किर यांच्या सामाजिक समरसतेच्या पुण्याईने पावन झालेल्या रत्नागिरी शहरातील पतीतपावन मंदिराची पुनर्उभारणी व परिसराचे सुशोभीकरण करण्याचा मनोदय आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला. सोमवारी आमदार सामंत यांनी पतीतपावन मंदिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी पतीतपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, अखिल हिंदू गणेशोत्सवचे अध्यक्ष मंदार खेडेकर, सेक्रेटरी तुषार खंडकर, विश्वस्त उमेश खंडकर, नितीन गुरव, विजय मुळ्ये, अमोद देसाई, मंदार खंडकर, संदीप रसाळ, मनोज जोशी, सचिन कोतवडेकर, विनय जोशी, राहुल औंगाबादकर, रुपेश शेलार यांच्यासह बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर उपस्थित होते.
या भेटीत मंदिर परिसर सुशोभीकरण आणि मंदिराची पुनर्उभारणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या मंदिर परिसरात स्वा. सावरकर यांच्या जाज्वल्य इतिहासाचे अर्थात जीवनपटाचे म्युरल उभारण्यात येणार असून त्याबाबत अधिकाऱ्यांनी जातीनिशी लक्ष घालण्याच्या सूचना आमदार सामंत यांनी यावेळी दिल्या. आमदार किरण सामंत यांनी मंदिर परिसराची पाहणी करून मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्याबाबत आराखडा बनविण्याच्या सूचना इथे उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. मंदिराच्या सुशोभीकरण कामासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगून त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या परिसरात स्वा. सावरकर यांच्या संबंधित वस्तू संग्रहालय उभारणी करण्यात येणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.