
महावितरणची थकबाकी @ ९९,०००,००,००,०००; साडेचार वर्षांत ४० हजार कोटींची वाढ!!
मुंबई – तुम्हाला ९९,०००,००,००,००० (९९ हजार कोटी) रुपयांचा हा आकडा पाहून वाटेल केंद्र किंवा राज्य सरकारच्या एखाद्या योजनेचा निधी असेल, पण हा आकडा ना सरकारचा निधी, ना हेल्पलाइन क्रमांक आहे. हा आकडा म्हणजे तुमच्या-आमच्या घरात वीज पुरवणाऱ्या महावितरण या कंपनीच्या थकीत वीजबिलाचा आहे. दहा-बारा वर्षांपासून फुगत चाललेली ही थकबाकी आता तब्बल ९८ हजार ८०४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
महावितरणकडून मुंबई वगळता राज्याच्या कानाकोपऱ्यातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्यक आणि कृषी पंपधारक शेतकरी अशा तब्बल पावणेतीन कोटींहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. २०१० पूर्वी दहा हजार कोटी रुपये असलेली ही थकबाकी काहीशी किरकोळ वाटत होती.मात्र गेल्या दीड दशकात हा थकबाकीचा आकडा फुगला आहे. ३१ ऑक्टोबर २०२४ च्या आकडेवारीनुसार महावितरणची थकबाकी ९८ हजार ८०४ कोटींवर पोहोचला आहे. यात वीजबिलाबरोबरच व्याज आणि दंडाचा समावेश आहे.सर्वाधिक कृषी पंपधारक शेतकऱ्यांकडे ७५ हजार ४६९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. औद्योगिक ग्राहकांकडे पातच हजार तर दिवाबत्तीच्या वीजबिलापोटी चार हजार ११४ कोटी रुपये थकीत आहेत.
ही थकबाकी वर्षानुवर्षे मागील पानावरून पुढे जात असल्याने त्याची वसुली कशी करायची, असा प्रश्न महावितरणसमोर आहे. महावितरणच्या एकूण वीजबिल थकबाकीपोटी सुमारे ७५ टक्के थकबाकी शेतकऱ्यांकडे आहे. त्याची वसुली होत नसल्याने त्यामध्ये दंड आणि व्याजाची दिवसेंदिवस भर पडत आहे.
थकबाकीची उड्डाणे (आकडे कोटी रुपयांत)
७५,४६९ – कृषी पंप
४,२१४ – दिवाबत्ती
३,१२५ – पाणीपुरवठा
३९६ – यंत्रमागधारक
२,६११ – घरगुती
६०२ – वाणिज्यक
३१२ – इतर
१०,५५५ – कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेले ग्राहक