
श्री सोमेश्वर फंड संस्थेतर्फे डॉक्टर चित्रा गोस्वामी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव संपन्न
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील श्री सोमेश्वर फंड संस्थेच्या वतीने सोमेश्वर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर चित्रा मिलिंद गोस्वामी यांच्या हस्ते उत्साही वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुहास चव्हाण हे होते.यावेळी डॉक्टर चित्रा गोस्वामी यांच्या हस्ते शालेय परीक्षांमध्ये तसेच सिंधू रत्न टॅलेंट सर्च परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विशेष गुणवत्ता संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. सोमेश्वर चिंचखरी येथील प्रगतीशील शेतकरी श्री. हेमंत फाटक यांना महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.रमेश बैस यांच्या हस्ते शासनाच्या आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा यावेळी श्री गणेश प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
डॉक्टर गोस्वामी यांचा संस्थाध्यक्ष श्री. सुहास जी चव्हाण यांच्या हस्ते श्री सरस्वतीची मूर्ती श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्यावतीने सन्मानित करण्यात आले.संस्था अध्यक्ष श्री. चव्हाण यांनी संस्थेच्या शतक महोत्सवी वाटचालीची माहिती दिली डॉक्टर चित्रा गोस्वामी यांनी सोमेश्वर सारख्या ग्रामीण भागातील शाळेत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमांचा गौरव करून अभिजात मराठी भाषेचा वापर आणि महिलांचे सक्षमीकरण याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे कार्यवाह श्री. राजेंद्र कदम, मुख्याध्यापक श्री. संदीप चव्हाण तसेच सर्वश्री राजेश हरचिरकर, समीर भातडे, दत्तात्रय सोहनी, नंदकिशोर महाजन, राहुल पवार, दीपक पवार, दीपक भातडे आदी मान्यवरांसह विद्यार्थी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक श्री. दीपक माळी यांनी केले तर संयोजन शिक्षिका सौ मानसी तावडे आणि श्रीमती स्नेहल सातपुते यांनी केले. शेवटी मुख्याध्यापक श्री.चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले