आयआयटी मुंबईमध्ये ‘गर्भविज्ञान’ कार्यक्रमावर विद्यार्थ्यांचा आक्षेप!

चांगल्या संततीला जन्म देण्याचे विज्ञान असलेल्या ‘गर्भविज्ञान’ या विषयावरील कार्यक्रमाचे आयआयटी मुंबईकडून आयोजन करण्यात आले असल्याचे निमंत्रण सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक यांना मेलद्वारे पाठविण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये मुलांच्या अंतर्गत आणि बाह्य गुणांवर प्रभाव टाकणारे घटक, पूर्वजांचा मुलांच्या गुणांवर कसा प्रभाव पडतो, गर्भधारणेदरम्यान आई आणि गर्भाचे आरोग्य, गर्भधारणेपूर्वी मन आणि शरीराची स्थिती, गर्भधारणेदरम्यान निष्काळजीपणाचे परिणाम आणि गर्भसंस्काराचे काही नियम याची माहिती यामध्ये देण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाला संशोधक, तरुण, प्रौढ, लहान मुलांचे पालक आणि शिक्षक उपस्थित राहू शकतात, असेही या मेलमध्ये म्हटले आहे. आयआयटीसारखी विज्ञान संस्था अशा कार्यक्रमाला मान्यता कशी देऊ शकते असा प्रश्न उपस्थित करत काही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला आक्षेप घेतला आहे.

मुंबई : आयआयटी मुंबईमध्ये संस्कृती आर्य गुरुकुलमच्या आयुर्वेद तज्ज्ञाचे ‘गर्भविज्ञान’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भातील निमत्रंण आयआयटी मुंबईतील सर्व विद्यार्थी, प्राध्यापकांना पाठविण्यात आले आहे. मात्र हे मिथ्या विज्ञान असून, या कार्यक्रमाला प्रशासनाकडून परवानगी कशी देण्यात आली असा मुद्दा उपस्थित करीत आयआयटी मुंबईमधील काही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे.

भंवरी देवी, कविता श्रीवत्सवा आणि वृंदा ग्रोव्हर यांच्या चर्चासत्राचे काही दिवसांपूर्वी आयआयटी मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा संघर्ष यावर चर्चा करण्यात येणार होती. मात्र हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला. त्यामुळे कामाच्या ठिकाणी महिलांचा संघर्ष दाखविणारा कार्यक्रम रद्द करायचे आणि मिथ्या विज्ञानाशी संबंधित असलेल्या कार्यकमांना परवानगी देऊन आयआयटी मुंबईच्या प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.आयआयटी मुंबईच्या संस्कृत विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये आयुर्वेदातील तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार असून, त्यात कोणत्याही प्रकारचा खोटेपणा असणार नाही. तसेच हा कार्यक्रम राजकीयदृष्ट्या संवेदनशीन नसल्याने तो संस्थेच्या पुनरावलोकन समितीकडे पाठविण्यात आला नसल्याचे आयआयटी मुंबईतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

भारतीय ज्ञान आणि विज्ञानाचे विश्लेषण करणे आवश्यक असून, त्यावर खुल्या पद्धतीनेही चर्चा झाली पाहिजे. गर्भ विज्ञान म्हणजे गर्भधारणेचा पद्धतशीर अभ्यास आणि आयुर्वेदातील आरोग्यदायी गर्भधारणेच्या पद्धतींवर प्रकाश टाकतो, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांचा संघर्ष हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून, तो गुरूवारी होणार असल्याचे आयआयटी मुंबईतील अधिकाऱ्याने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button