विशाळगडावरील उरूसाबाबत नीतेश राणेंचा स्पष्ट इशारा; म्हणाले, उगीच कोणाला चिथवण्याचे प्रकार करू नका, अन्यथा..
सांगली :* विशाळगडावर येत्या रविवारी (ता. १२) उरूस आहे. तेथे काही महिन्यांपूर्वी काय घडले, हे सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदू समाजाच्या इच्छेनुसार त्या दिवशी तिकडे कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडवू नये. तेव्हा हिंदू समाजाने संयमाने घेतले होते; अन्य धर्मानेही संयमाने घ्यावे. उरूस आणि इतर सगळ्यांचे नियोजन करून उगीच कोणाला चिथवण्याचे, भडकावण्याचे प्रकार करू नयेत. शासन म्हणून त्यावर लक्ष ठेवून आहोत, असा इशारा मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी हिंदू गर्जना सभेत दिला.हिंदू एकता आंदोलन व हिंदू गर्जना सभेतर्फे राज्यातील पहिल्या हिंदू व्यावसायिक संमेलनाचे उदघाटन मंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन येथे हिंदू गर्जना सभा झाली.
आमदार सुरेश खाडे व सत्यजित देशमुख, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, नीता केळकर आदी उपस्थित होते.राणे म्हणाले, ‘राज्यात हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे यापुढे हिंदूंच्या आर्थिक सक्षमतेची, संरक्षणासाठी सरकार काम करणार आहे. हिंदुत्वाच्या नावानेच राज्य प्रगती करणार आहे. देशात ९० टक्के हिंदू असल्याने हिंदू राष्ट्राच्या प्रमाणपत्राची गरज नाही. पहिल्यांदाच हिंदू व्यावसायिकांचे व्यासपीठ तयार केले ही खूप चांगली बाब आहे. हे राष्ट्र हिंदूच आहे. हिंदुत्वाच्या दिशेनेच देशाची वाटचाल सुरू आहे. प्रथम हिंदूंचे हित मग बाकीचे. ज्यांना सर्वधर्मसमभावाची टेप रेकॉर्ड वाजवायची आहे. त्यांनी पाकिस्तानात जाऊन वाजवावी. हिंदू सक्षम करणे हेच ध्येय आहे. हिंदूंचा धाक, भीती आणि वचक असला पाहिजे.’ ते म्हणाले, ‘ज्यांच्याकडून खरेदी करतो त्यांच्या माध्यमातून आपला पैसा जिहादसाठी तर वापरला जात नाही ना? याचा विचार करावा.
हिंदू व्यावसायिकांना आर्थिक सक्षम करण्यासाठी हिंदूनी हिंदू व्यावसायिकांकडूनच खरेदी करावी. सांगलीत ज्याप्रमाणे हिंदू व्यावसायिकांचे एकत्रिकरण करण्यात आले तसाच उपक्रम राज्यभर राबविण्याची आवश्यकता आहे.’
मिनी पाकिस्तानात मी लढतोय, तरीही चार वेळा निवडून येऊन मी चौकार मारलाय, असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार सुरेश खाडे यांनी हिंदू गर्जना सभेत मिरजेची तुलना पाकिस्तानशी केली. खाडे छोटेखानी भाषणात म्हणाले, ‘विधानसभेला ‘बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है’ नाऱ्यावर हिंदू एकत्र आले आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आले. ज्यांनी साथ दिली नाही त्यांचा कार्यक्रम करणार आहे.”