जागतिक मराठी विश्व संमेलन २०२५ – मराठीचा जागतिक उत्सव! ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पहिला ऐतिहासिक सोहळा पुण्यात होत आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि कला यांचा जागतिक स्तरावर सन्मान करणारे हे संमेलन आपण सर्वांनी मोठं करायचं आहे, यासाठी राज्यातील सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. याबाबत आज राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी पुण्यात एक आढावा बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या, बालसाहित्यापासून लोककलेपर्यंत समावेश, महाराष्ट्रासह परदेशातील साहित्यिकांचा सहभाग, लोककलावंतांचे सादरीकरण, उद्योजकांचा परिसंवाद आणि मराठी भाषा, कला-परंपरेचे जतन असा विविधांगी कार्यक्रमांची रेलचेल असलेले हे संमेलन ऐतिहासिक ठरणार असल्याचे ह्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
AI सारख्या व इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषा जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न शासनामार्फत करण्यात येत आहेत. जागतिक मराठी साहित्याची दखल विश्वाने घ्यावी, असा आमचा प्रयत्न असणार आहे, असे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले. मराठीच्या वैभवाला नवा आयाम देणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र जी सिंह शेखावत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थिती राहणार आहेत. राज्यातील साहित्य-कला आणि मराठीप्रेमी जनतेने या कार्यक्रमात योगदान देऊन मराठीचा जागतिक स्तरावर सन्मान वाढवावा असं आवाहन ह्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केले.