आमदार साहेब तुम्ही मंडणगडच्या रस्त्यावर दुचाकी चालवून दाखवाच, सामाजिक कार्यकर्त्यांचे आव्हान.
दापोली-मंडणगड खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांना मंडणगड तालुकावासियांच्या वतीने आव्हान देण्यात आले आहे, तुम्ही निवडणुकीच्या काळात युवकांच्या मेळाव्यात तुमच्या विजयी यात्रेत सपत्नीक दुचाकी चालवलीत, खूप समाधान वाटले. पण तुम्हाला आमचे आता आव्हान आहे, तुम्ही मंडणगड तालुक्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या दापोली फाटा ते मंडणगड बस स्थानक यादरम्यान दुचाकीवरून प्रवास करून दाखवाच.
या मार्गावर सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेला सरकारी दवाखाना, शिवसेना शिंदे संघटनेचे संपर्क कार्यालय, पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय, गुरांचा दवाखाना अशी अनेक कार्यालये आहेत. अत्यंत रहदारीचा हा रस्ता आता वाहने चालवण्याच्या योग्यतेचा राहिलेला नाही. तरी आपण या रस्त्यावर आता दुचाकी चालवून दाखवाच असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास शेट्ये व काही नागरिकांनी दिले आहे.www.konkantoday.com